महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबरोबरच १३ राज्यांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये १० जागांवर पोटनिवडणूक आहे. येत्या १३ नोव्हेंबरला उत्तर प्रदेशमध्ये मतदान आहे. सपा आणि काँग्रेस या राज्यात एकत्र लढणार आहेत. परंतू, जागा वाटपावरून काँग्रेस सपासोबतची मैत्री तोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात जागावाटपावरून महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये बिनसलेले असताना आता उत्तर प्रदेशमध्येही तोच कित्ता गिरविला जात आहे. काँग्रेस आणि अखिलेश यादवांच्या सपामध्ये तणाव निर्माण होत आहे. सपाने काँग्रेसला अलीगढमधील खैर आणि गाझियाबाद या दोन जागा सोडल्या आहेत. मात्र काँग्रेसला पाच जागा हव्या आहेत. पाच जागा मागितल्या तर किमान तीन मिळतील अशी काँग्रेसला अपेक्षा होती. परंतू तसे न घडल्याने काँग्रेस आघाडी तोडण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास भाजपा विरुद्ध सपा विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे.
जागावाटपाची चर्चा करताना काँग्रेस हव्या तेवढ्या सीट मिळविण्यात अयपशी ठरली आहे. सपाने दोनच जागा देणार असल्याचे ठणकावले आहे. या दोन-पाचच्या आकड्यात उत्तर प्रदेशातील आघाडी बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सपाविरोधात नाराजी दाखविण्यासाठी काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये एकही उमेदवार न देण्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
सुत्रांनुसार काँग्रेस स्वत:चे उमेदवार देणार नाही. तर मऊ आणि घोसी जागांवर सपाला पाठिंबा देणार आहे. काँग्रेसकडून याबाबात काहीही अधिकृत आलेले नसले तरी याद्वारे काँग्रेस तिसरी जागा फुलपूर आपल्या पारड्यात पाडण्यासाठी दबाव आणत असल्याचे बोलले जात आहे. सपाने या जागेवर आधीच उमेदवार जाहीर केला आहे. जर ही तिसरी जागा मिळाली तरच काँग्रेस पहिल्या दोन जागांवर उमेदवार उतरविणार असल्याच्या भुमिकेत दिसत आहे.