ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 9 - वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईकसंबंधीचा अहवाल मुंबई पोलिसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे. काही दिवसांपुर्वी चौकशी अहवाल अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिली होती. लवकरच हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार आज मुंबई पोलिसांनी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त केला.
मुंबई पोलिसांनी झाकीर नाईकची भाषणे, त्यांचे समर्थक, विरोधक तसेच सोशल मीडियावरील हालचालीवरून अधिक तपास सुरू केला होता. अहवालात झाकीर नाईकवर धार्मिक तणाव भडकावण्यासोबतच गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. झाकीर नाईककडून धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. तसंच झाकीर नाईकचे अर्शीद कुरेशी आणि इसीस कनेक्शन असल्याचंही अहवालात पोलिसांनी नमूद केलं आहे. केरळमधील तरुणांना इसीस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी अर्शीद कुरेशी याला अटक करण्यात आली होती.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या अहवालानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
झाकीर नाईकवर कारवाई करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या तपासात 55 दहशतवादी झाकीर नाईकपासून प्रेरित झाल्याची माहिती समोर आली होती. देशभरातून गेल्या 10 वर्षात अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्यांची सुरक्षा यंत्रणांनी यादी तयार केली आहे. या 55 दहशतवाद्यांनी आपण झाकीर नाईकपासून प्रेरित झाल्याची कबुलीही दिली आहे.
झाकीर नाईकवर कायदेशी कारवाई करता येऊ शकते का, याची चाचपणी करण्यासाठी केंद्रीय गृहंत्रालयाने सुरक्षा यंत्रणांना तपास करण्यास सांगितलं होतं. राष्ट्रीय तपास यंत्रणाने (एनआयए) 2005 पासून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची चौकशी केली. हे सर्व दहशतवादी सिमी, लश्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिद्दीन आणि इसिस या संघटनांसाठी काम करताना पकडले गेले होते. यात 3 पोलिसांचाही समावेश आहे.