नवी दिल्ली : राज्यघटनेचे पावित्र्य राखा, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंगळवारी राज्यपालांच्या दोनदिवसीय परिषदेचे उद्घाटन करताना केले. अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावरून राज्यपालांच्या भूमिकेचा मुद्दा वादाच्या केंद्रस्थानी आला असताना मुखर्जी यांच्या आवाहनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.घटनात्मक पदांवरील व्यक्तींनी राज्यघटनेने घालून दिलेल्या तत्त्वांना बांधील राहणे आवश्यक आहे. राज्यघटनेत लोकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित होत असून त्याची पूर्तता करण्यासाठी सर्वसमावेशक असे मार्गही दाखविले आहेत. घटनात्मक पदांवर असलेल्या सर्वांना राज्यघटनेचे प्रावित्र्य राखणे अपरिहार्य ठरते, असे ते राष्ट्रपती भवनात आयोजित राज्यपालांच्या परिषदेला संबोधित करताना म्हणाले. राज्यपाल जे.पी. राजखोवा यांनी अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्याच्या पार्श्वभूमीकडे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या अंगुलीनिर्देश केल्याचे मानले जाते. आंतरराष्ट्रीय मुद्दे चर्चेतून सोडविण्याचे प्रयत्न कायम ठेवावे लागतील, असेही ते म्हणाले. या परिषदेला २३ राज्यपाल आणि नायब राज्यपाल उपस्थित होते.दुष्काळाकडे वेधले लक्ष...लागोपाठ दोन वर्षे अपुऱ्या पावसामुळे देशाला दुष्काळाचा फटका बसला आहे. कोरड्या दुष्काळाचा परिणाम कृषी उत्पादन घटण्यात होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना पिकांची जोखीम उचलता यावी यासाठी नुकतीच प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. अशा प्रयत्नांतून शेतकऱ्यांना दिलासा देण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. वातावरणाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी कृषी संशोधन संस्थांनी धान्य आणि अन्य पिकांचे दुष्काळात तग धरू शकणारे वाण विकसित करायला हवे, असेही राष्ट्रपती म्हणाले.
राज्यघटनेचे पावित्र्य राखा : राष्ट्रपती
By admin | Published: February 10, 2016 2:14 AM