नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाची काल शुक्रवारी सायंकाळी बैठक झाली. या बैठकीत सध्याची 16वी लोकसभा विसर्जित करण्याचा आणि नरेंद्र मोदी यांच्या आभाराचा, असे दोन प्रस्ताव पारित करण्यात आले. या बैठकीनंतर नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपले राजीनामे सुपूर्द केले. त्यानंतर राष्ट्रपतींनी सुद्धा त्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत
लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या इनिंग्जची जय्यत तयारी सुरू झाली असून, नरेंद्र मोदी यांचा शपथविधी बहुधा येत्या गुरुवारी 30 मे रोजी होईल, अशी शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. या बैठकीत सध्याची 16वी लोकसभा विसर्जित करण्याचा आणि मोदी यांच्या आभाराचा, असे दोन ठराव मंजूर करण्यात आले.
या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली व लोकसभा विसर्जनाच्या शिफारशीचा मंत्रिमंडळाचा ठराव त्यांना सादर केला. त्यासोबतच मोदींनी आपल्या सध्याच्या मंत्रिमंडळाचा औपचारिक राजीनामाही राष्ट्रपतींना सोपविला. तो स्वीकारून नवे सरकार स्थापन होईपर्यंत मोदी यांनीच पंतप्रधानपद सांभाळावे, असे निर्देश राष्ट्रपतींनी दिले आहेत.