Ayodhya Deepotsav 2023: अयोध्येतील राममंदिराच्या पहिल्या टप्प्याचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करत मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पुढील वर्षी २२ जानेवारीला होणार आहे; तर, २० ते २४ जानेवारीदरम्यान कोणत्याही दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी या संबंधित कार्यक्रमात सहभागी होतील, अशी माहिती दिली. मात्र, तत्पूर्वी अयोध्येमधील दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच यंदा २१ लाख दिवे प्रज्ज्वलित करून नवा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यंदाचा अयोध्येतील दीपोत्सव खास असणार आहे. दीपोत्सवासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यावेळी दीपोत्सवात नवा विक्रम करण्याचा मानस केला जात आहे. यंदा २१ लाख दिवे प्रज्ज्वलित करण्याची तयारी सुरू आहे. अयोध्येतील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या अयोध्येत येण्याच्या शक्यतेबाबत तयारीला सुरुवात केली आहे. आवश्यक ती सर्व व्यवस्था आणि तपास पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
२१ लाख दिवे अन् २५ हजार स्वयंसेवक कार्यकर्ते
सन २०१७ पासून अयोध्येत दीपोत्सव साजरा केला जात आहे. २०१७ मध्ये येथे १.८७ लाख दिवे प्रज्ज्वलित करण्यात आले होते. तर सन २०१८ मध्ये ३ लाखाहून अधिक दिवे लावण्यात आले. सन २०१९ मध्ये ४ लाख, २०२० मध्ये ६.६६ लाख, २०२१ मध्ये ९ लाख आणि २०२२ मध्ये १५ लाखांहून अधिक दिवे लावण्याचा जागतिक विक्रम केला गेला. गेल्या वर्षी आयोजित केलेल्या सोहळ्यात १९ हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते. यावेळी त्यांची संख्या २५ हजारांवर जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान असताना नरेंद्र मोदी अयोध्येत तिसऱ्यांदा येतील. यापूर्वी ते राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येत आले होते. त्यानंतर २०२२ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी दीपोत्सव कार्यक्रमात सहभाग घेतला. यंदाही पंतप्रधान मोदी दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. दुसरीकडे, राम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. पुढील वर्षी जानेवारीमध्ये राम मंदिराच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहू शकतात, असे सांगितले जात आहे.