नवी दिल्ली: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. द्रौपदी मुर्मू यांचे राजधानी दिल्लीतील जगन्नाथ मंदिरातील हा फोटो असून, यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. मंदिरात राष्ट्रपती मुर्मू आदिवासी समाजातील असल्यामुळे त्यांच्यासोबत भेदभाव करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर दावा केला जातोय. मात्र मंदिर प्रशासनाने असा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.
नेमका काय वाद?राष्ट्रपती भवनाने 20 जूनपासून एक ट्विट केले होते, ज्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिल्लीतील श्री जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी गेल्याचे सांगण्यात आले. ट्विटमध्ये लिहिले की, 'भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेच्या प्रारंभानिमित्त मी सर्व देशवासियांना, विशेषत: भगवान जगन्नाथांच्या भक्तांचे मनःपूर्वक अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते. भक्ती आणि समर्पणाचा हा सण सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो, हीच मी महाप्रभू जगन्नाथांना प्रार्थना करते. जय जगन्नाथ!'
राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी देवाचे दर्शनही घेतले. तो दिवस मुर्मू यांच्यासाठी खूप खास होता, कारण 20 जून रोजी राष्ट्रपतींचा वाढदिवस असल्याने त्या श्री जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. मंदिरातील फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला. फोटोंमध्ये मुर्मू मंदिराच्या गर्भगृहाबाहेर उभे राहून पूजा करताना दिसत आहेत, तर मंदिराचे पुजारी गर्भगृहाच्या आत आहेत. सोशल मीडियावर काही लोकांनी या फोटोवर आक्षेप घेत राष्ट्रपतींना येथील मंदिरात प्रवेश न देणे चुकीचे असल्याचे म्हटले. अनेकांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, धर्मेंद्र प्रधान यांची जुनी छायाचित्रे ट्विट केली, ज्यात ते गर्भगृहात उभे राहून पूजा करताना दिसत आहेत.
वादावर मंदिर प्रशासन काय म्हणाले?हा वाद सुरू असताना मंदिराच्या पुजाऱ्याने पुढे येऊन संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत, मंदिराचे पुजारी सनातन पाडी म्हणाले की, श्री जगन्नाथ मंदिराच्या गर्भगृहात पूजा करण्यासाठी एक प्रोटोकॉल आहे. कुठल्याही जातीचा हिंदू मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश आणि पूजा करू शकतो. मंदिरात येणारे सर्व भाविक बाहेरुनच पूजा करतात. त्या दिवशी राष्ट्रपती वाढदिवसानिमित्त राष्ट्रपती पूजेला आल्या होत्या, त्यामुळे त्यांनी बाहेरून पूजा केली. ज्या लोकांना अधिकृतपणे आमंत्रित केले जाते, त्यांनाच मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश दिला जातो. त्या दिवशी राष्ट्रपती खासगीरित्या मंदिरात आल्या होत्या, म्हणूनच त्यांनी बाहेरुन पूजा केली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले धर्मेंद्र प्रधान आणि अश्विनी वैष्णव यांचे फोटोही रथयात्रेतील आहेत.