Droupadi Murmu President: द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांचा शपथग्रहण सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. पण NDA मधील एक महत्त्वाचा मानला जाणारा घटक पक्षाचे प्रमुख मात्र या शपथग्रहण सोहळ्यासाठी अनुपस्थित असल्याचे दिसले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. पण आजच्या शपथग्रहण कार्यक्रमाला ते अनुपस्थित राहिले. शपथविधीला त्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधकांना भाजप-जेडीयू संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची आयतीच संधी मिळाली. मात्र आता ते अनुपस्थित का राहिले याचे कारण समोर आले आहे.
राजद ( RJD ) उपाध्यक्ष शिवानंद तिवारी म्हणाले की, भाजप आणि जेडीयूमध्ये काय सुरू आहे, मला समजत नाही. मुख्यमंत्री नितीश कुमार हे आता भाजपमध्ये पूर्वीसारखे मिळून-मिसळून राहिल्याचे दिसत नाहीत. ते शपथविधीला उपस्थित न राहण्यामागचे कारण दोघांनाही ठाऊक असल्याचे ते म्हणाले.
खरं कारण अखेर समोर आलं...
RJD ने उपस्थित केलेल्या प्रश्नाला JDU ने उत्तर दिले. माजी मंत्री नीरज कुमार म्हणाले, "जेव्हा आम्ही द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा दिला, तेव्हाच साऱ्यांना समजलं पाहिजे होतं की भाजपा आणि आमच्यात सारं काही आलबेल आहे. यात नाराजीची चर्चा आलीच कुठून? मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते शपथविधी सोहळ्याला पोहोचू शकले नाहीत, असेही सीएम हाउसमधील सूत्रांनी सांगितले. नितीश कुमार एवढ्या महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये काही कारणास्तव सहभाग घेतला नव्हता, ज्यात भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निमंत्रण दिले होते. १७ जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. शुक्रवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या डिनरलाही ते उपस्थित राहिले नाहीत. कारण त्यांची प्रकृती ठीक नाही.