“CJI चंद्रचूड यांच्यामुळे इतरांनाही प्रेरणी मिळेल”; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 02:31 PM2023-05-25T14:31:41+5:302023-05-25T14:32:18+5:30
CJI D. Y. Chandrachud: एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे कौतुक केले.
CJI D. Y. Chandrachud: गेल्या अनेक दिवसांपासून देशाचे सरन्यायाधीश विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. सुनावणी घेताना अनेकदा ते वकिलांना खडेबोल सुनावताना दिसले. तर अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये न्यायदानाचे काम करताना आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले. यातच आता देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीश. डी. वाय. चंद्रचूड यांचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. झारखंड येथे उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उपस्थिती लावली होती.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी झारखंड उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपतींनी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या हिंदीतील भाषणाबद्दल त्यांचे कौतुक केले. न्यायासाठी सार्वत्रिक प्रवेश सुनिश्चित करण्यात भाषेच्या भूमिकेबद्दल बोलल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी चंद्रचूड यांचे कौतुक केले. हे पाहून इतर न्यायाधीशही याचे अनुकरण करतील, असे राष्ट्रपती मुर्मू यावेळी बोलताना म्हणाल्या.
उद्घाटन समारंभात सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी हिंदीत भाषण केले. मला आशा आहे की तुम्ही मला रांचीला परतण्याची संधी द्याल, असे सांगत चंद्रचूड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावर, भाषा हा न्यायापर्यंत पोहोचण्याचा आणखी एक पैलू आहे. मी हिंदी भाषेबद्दल बोलतेय. पण संवाद इंग्रजीतून साधतेय. CJI चंद्रचूड यांनी हिंदीत भाषण केल्यामुळे मला त्यांचे आभार मानायचे आहेत, असे राष्ट्रपती यांनी नमूद केले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय त्यांचे काम इंग्रजी भाषेतून करतात. ६.४ लाख गावांमध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंत आम्ही आमचे निर्णय पोहोचवू शकतो. पण त्यासाठी हे निर्णय इंग्रजी भाषेतून तेथील स्थानिक भाषांमध्ये अनुवादित करण्याची गरज आहे. सर्वोच्च न्यायालयाने AI चा वापर करून निकालांच्या भाषांतराचे काम सुरू केले आहे. आम्ही ६ हजारांहून अधिक निकालांचे हिंदीत भाषांतर केले आहे, असे चंद्रचूड यांनी नमूद केले.