Bullet Train In India: बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील समस्यांमुळे बुलेट ट्रेनचे काम संथगतीने सुरू होते. तर गुजरातमधील काम तुलनेने बऱ्यापैकी सुरू होते. आता दोन्ही राज्यांतील कामांना वेग आल्याचे सांगितले जात आहे. यातच आता संपूर्ण देशात बुलेट ट्रेन सुरू करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे सांगितले जात आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर संसदेचे अधिवेशन सुरू असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेला संबोधित केले. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यात बुलेट ट्रेन विस्ताराबाबतही माहिती दिली. संपूर्ण देशात आता बुलेट ट्रेनचा विस्तार करण्याची योजना केंद्र सरकारची आहे. त्यासाठी एक अभ्यास आणि निरीक्षण केले जाणार आहे.
देशातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देताना राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले की, सरकारने देशाच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्वेकडील बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी अभ्यास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभ्यासात बुलेट ट्रेन धावण्यासाठी कोणते मार्ग असू शकतात हे पाहिले जाईल. त्यासाठी किती जमीन लागेल? ट्रॅक कसा बांधणार? या प्रकल्पावर सरकार किती खर्च अपेक्षित आहे? या सर्व गोष्टी तपासल्या जाणार आहेत.
अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान हाय-स्पीड रेल्वे इकोसिस्टमचे कामही वेगाने सुरू आहे. ५०८ किमी लांबीचा अहमदाबाद-मुंबई हाय-स्पीड कॉरिडॉर हा देशातील पहिला असा कॉरिडॉर आहे ज्यावर बुलेट ट्रेन ताशी ३२० किमी वेगाने धावेल. सुरत येथे मर्यादित थांब्यांसह संपूर्ण अंतर केवळ २ तास ७ मिनिटांत कापता येणे शक्य होणार आहे. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशनने सुरत आणि बिलीमोरा दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण केले जाईल, असे सांगितले आहे.