राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार असलेल्या द्रौपदी मुर्मू यांचा मोठा विजय झाला आहे. त्यांना उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या भाजपशासित राज्यांमधून जबरदस्त पाठिंबा मिळाला आहे. विशेष म्हणजे, भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमधूनही त्यांना मोठा पाठिंबा मिळाला आहे. यात आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. येथे सत्ताधारी क्षापासून ते विरोधी पक्षांपर्यंत सर्वांनी त्यांना मतदान केले आहे. याशिवाय देशातील 17 खासदार आणि 126 आमदारांनी पार्टी लाईनच्या वर येऊन द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले आहे. यामुळे त्यांचा अपेक्षे पेक्षाही मोठा विजय झाला आहे.
आमदारांच्या क्रॉस व्होटिंगसंदर्भात बोलायचे झाल्यास, सर्वाधिक क्रॉस व्होटिंग आसाममध्ये झाले. येथे 22 आमदारांनी पार्टी लाईन सोडत द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले. याशिवाय मध्यप्रदेशात 19, महाराष्ट्रात 16 तर उत्तर प्रदेशात 12 आमदारांनी द्रौपदी मुर्मू यांना क्रॉस व्होटींग केले. त्यांच्या पक्षाने यशवंत सिन्हांचे समर्थन केले होते. एवढेच नाही, तर लवकरच निवडणुका होणार असलेल्या गुजरातमध्येही काँग्रेसच्या 10 आमदारांनी मुर्मू यांचे समर्थन केले आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. तसेच, झारखंडमध्येही झामुमोने भलेही समर्थनाची घोषणा केली असेल, मात्र, काँग्रेस आणि इतर पक्षाच्या 10 आमदारांनीह क्रॉस व्होटिंग केले आहे.
राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही काँग्रेसच्या आमदारांनी केली क्रॉस व्होटींग -बिहारमध्ये 6 आमदारांनी आणि काँग्रेस शासित राज्य असलेल्या छत्तीसगडमध्येही 6 आमदारांनी क्रॉस व्होटिंग करून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला. खरे तर, आदिवासी बहुल भागातून येणाऱ्या आमदारांनी मूर्मी यांना पाठिंगा दिला असल्याचे मानले जात आहे. राजस्थानातही काँग्रेसच्या 5 आमदारांनी क्रॉस व्हटिंग केले. गोव्यातही काँग्रेसच्या 4 आमदारांनी द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले.
बंगालमध्ये टीएमसीच्या चार आमदारांचे व्होट इनव्हॅलिड -राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदानावेळी पश्चिम बंगालमध्ये भाजपचे खासदार आणि आमदार क्रॉस व्होटिंग करून यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देतील, असे वाटत होते. मात्र, याउलट टीएमसीच्याच एका आमदाराने द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले. यासंदर्भात बंगालमधील विरोधीपक्ष नेते शुभेंदू अधिकारी यांनी ट्विट केले आहे, की 'भाजपच्या 70 आमदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. याशिवाय, टीएमसीच्या एका आमदारानेही त्यांना मतदान केले आहे. तसेच, 4 टीएमसी आमदारांनी आपले मतदानच इनव्हॅलिड केले आहे.'