नवी दिल्ली - देशात १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये बैठकीचा सिलसिला सुरू झाला आहे. याचपार्श्वभूमीवर एक महत्वाची माहिती समोर येत आहे.
एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानूसार, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. फोनवरुन झालेल्या या संवादात राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरेंकडे पाठिंबा मागितल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच राजनाथ सिंह आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची शक्यताही बळावली आहे. लवकरच दोन्ही नेत्यांची दिल्ली किंवा मुंबईत औपचारिक भेट होण्याची शक्यता आहे.
१८ जुलै रोजी देशात राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. त्यानंतर २१ जुलैला निकाल येईल. संविधान नियमानुसार, देशात विद्यमान राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपण्याआधीच पुढील राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. आकडेवारीचं गणित लावलं तर भाजपा लोकसभा आणि राज्यसभेत मजबूत स्थितीत आहे. त्याशिवाय अनेक राज्यात भाजपाचं सरकार आहे.
अफवांना ऊत-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या घराला भेट दिली, त्यातून नवी बातमी उगवली. गोविंद यांना पुन्हा संधी देण्यात येणार की काय? परंतु पंतप्रधानांचे हे मावळत्या राष्ट्रपतींबद्दल केवळ एक सद्भावपूर्ण वागणे होते, असे पंतप्रधान कार्यालयातील सूत्रे सांगतात. अशी जोरदार बोलवा आहे की, पुढचे राष्ट्रपती इतर मागासवर्गीयांतून निवडले जातील. दक्षिणेतून निवड होण्याची शक्यता अधिक असून महिलेला प्राधान्य दिले जाऊ शकते.
गोपाळकृष्ण गांधी विरोधी पक्षाचे उमेदवार?
राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांनी ऑफर नाकारल्यानंतर आता विरोधकांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांच्याशी संपर्क साधला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गांधी २०१७ मध्ये उपराष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार होते. परंतु व्यैकया नायडू यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. काही विरोधी पक्षातील नेत्यांनी गोपाळकृष्ण गांधी यांना राष्ट्रपती निवडणुकीत संयुक्त उमेदवार म्हणून उभे राहण्याची विनंती करत विचार करण्याचा आग्रह केला आहे.
यांना करता नाही येणार मतदान-
राज्यसभेच्या १२ नामनिर्देशित सदस्य आणि लोकसभा किंवा विधानसभा सदस्यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही. विशेष म्हणजे, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साह यांनी राज्यसभेचा राजीनामा दिलेला नसल्याने ते मतदान करतील.