नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड दिसत आहेत. गेल्या काही काळापासून भाजपासोबत तीव्र मतभेद असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुर्मू यांना पाठिंबा दिला होता. तर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनीही द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांनी पक्षाच्या हायकमांडलाही सल्ला दिला आहे. याबाबत आचार्य प्रमोद कृष्णम यांनीही एक ट्विट केलं आहे.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची आज १० जनपथ येथे एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसह इतर मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. काँग्रेसच्या या बैठकीपूर्वी प्रमोद कृष्णम यांचं हे ट्विट चर्चेत आलं आहे.
या ट्विटमध्ये आचार्य प्रमोद कृष्णम यांनी लिहिले की, पंडित मोतीलाल नेहरू यांच्यापासून आजपर्यंत काँग्रेस नेहमीच शोषित, वंचित आणि आदिवासींसोबत उभी राहिली आहे. राष्ट्रपती निवडणुकीत एका आदिवासी महिला उमेदवाराला विरोध करणे माझ्यामते अयोग्य आहे. पक्षाच्या हायकमांडने याचा पुनर्विचार केला पाहिजे. मात्र या ट्विटवर आतापर्यंत कुठल्याही काँग्रेस नेत्याकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, याआधीही आचार्च प्रमोद कृष्णम यांनी अनेकदा अशी विधानं केली आहेत जी काँग्रेसच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात होती. हल्लीच त्यांनी विरोधी पक्षांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या एका विधानावरही टीका केली होती.