राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात तृनमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज दिल्ली येथे बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी त्यांनी एकूण 18 पक्षांना आमंत्रित केल्याचे समजते. मात्र, या बैठकीत बीजेडी, टीआरएस आणि आम आदमी पार्टीने सहभागी होण्यास नकार दिला आहे.
एकीकडे टीआरएसने काँग्रेसला निमंत्रण दिल्यामुळे येणार नसल्याचे म्हटले आहे. तर बीजेडी आणि आम आदमी पक्षाने, राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात आताच बैठक बोलावणे घाईचे असल्याचे म्हटले आहे. यांपैकी बीजेडीची भूमिका विरोधकांची चिंता वाढवणारी आहे. तर भाजपला बुस्ट मिळू शकतो. खरे तर, बीजेडी ने ममतांच्या बैठकीला जाण्यास नकार देण्याचे कारण सांगताना, यावर आताच चर्चा करणे घाईचे होईल, असे म्हटले आहे.
बीजेडीच्या एका वक्तव्याने वाढणार विरोधकांचं टेन्शन -राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात आम्ही एनडीएचा उमेदवार पाहूनच कोणताही निर्णय घेऊ, असे ओडिशातील सत्ताधारी पक्ष असलेल्या BJD ने म्हटले आहे. एवढेच नाही, तर एनडीएच्या वतीने चर्चेत असलेल्या द्रौपदी मुर्मू यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी समोर आल्यास, त्यांना विरोध करणे आम्हाला कठीण जाईल, असे बीजेडीच्या सूत्रांनी म्हटले आहे. खरे तर, द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातून येतात. त्यांचा जन्म ओडिशातच झाला आहे. एवढेच नाही, तर त्या 2000 मध्ये भाजप आणि बीजेडी युती सरकारमध्ये ओडिशाच्या मंत्रीही होत्या. यामुळे, राज्याला डोळ्यासमोर ठेऊन आणि त्या एक आदिवासी नेत्या असल्याने बीजेडी त्यांना विरोध करणार नाही.
बीजेडीच्या समर्थनानंतर, भाजप मॅजिक फिगरच्या अगदी जवळ पोहोचेल -बीजेडीने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यास, राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकणे भाजपला अगदी सोपे होईल. या निवडणुकीच्या गणितासंदर्भात बोलायचे झाल्यास एकूण मतांचे मूल्य 10,79,206 एवढे आहे. यामुळे या निवडणुकीत विजयासाठी एनडीएला अर्ध्याहून अधिक मतांची, म्हणजेच ५ लाख ४० हजार मतांची गरज आहे. एकट्या भाजपकडे 4,59,414 मते आहेत. याशिवाय त्यांचा मित्रपक्ष जेडीयूच्या मतांचे मूल्य 22,485 आणि AIADMK च्या मतांचे मूल्य 15,816 एवढे आहे. अशा प्रकारे एनडीएच्या एकूण मतांचे मूल्य 4,97,715 वर पोहोचते.एनडीएला कमी पडतायत केवळ 43 हजार मुल्य एवढी मते - अशा स्थितीत एनडीएला केवळ 43 हजार मुल्य एवढी मते कमी पडत आहेत. बीजेडीबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांच्या मतांचे मूल्य 31,686 एवढे आहे. तर याच वेळी, आंध्र प्रदेशातील सत्ताधारी पक्ष असलेल्या वायएसआर काँग्रेसच्या मतांचे मूल्य 43,450 एवढे आहे. यामुळे त्यांच्या बाजूनेही पाठिंबा मिळाला तरी एनडीए सहजपणे जिंकू शकते.