नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज कार्यक्रम जाहीर केला आहे. आता लवकरच सत्ताधारी भाजपाकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात येणार आहे. तर आता विरोधी पक्षही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार देणार की, एनडीएच्या उमेदवाराच्या नावावर एकमत होणार याबाबत तर्कवितर्काना उधाण आले आहे.
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून काँग्रेसकडून गुलाम नबी आझाद यांचं नाव पुढे आहे. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरून विरोधी पक्षांमध्ये एकमत तयार करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेस नेत्यांने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार काँग्रेसचा असू शकतो किंवा टीएमसीचा उमेदवार असू शकतो. काँग्रेसमध्ये पक्षपातळीवर गुलाम नबी आझाद यांच्या नावावर पक्षाच्या पातळीवर चर्चा झाली आहे. गुलाम नबी आझाद यांचे विरोधी नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. मात्र हे नाव अंतिम झालेले नाही.
जर काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावावर विरोधी पक्षांचं एकमत न झाल्यास तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराचं नाव समोर येऊ शकतं. त्यावर विरोधकांचं ऐक्य झाल्यास त्या उमेदवाराला काँग्रेस पाठिंबा देऊ शकतो.
सध्या एनडीएकडे ४८.५ टक्के तर बिगर एनडीए पक्षांकडे ५१.५ टक्के मते आहेत. यात यूपीए पक्षांचा वाटा हा २४ ते २५ टक्के आहे. काँग्रेसच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार आता सर्व काही बीजेडी आणि वायएसआर काँग्रेसच्या भूमिकेवर अवलंबून आहे. मात्र या पक्षांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी आहे, असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे.
अशा परिस्थितीत काँग्रेस पक्ष विरोधी पक्षांशी चर्चा करून ज्याच्याबाबत एकमत होईल, असा उमेदवार उतरवण्याचा प्रयत्न करेलं.