नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदाची निवडणूक येत्या १८ जुलैला होणार आहे. तत्पूर्वी विरोधकांनी या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत संयुक्त बैठकीचं आयोजन केले होते. ममता बॅनर्जी आणि शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत विरोधकांकडून एक उमेदवार करण्याबाबत चर्चा झाली. शरद पवारांनी राष्ट्रपती निवडणुकीत रस नसल्याचं सांगितले. या बैठकीला अनेक पक्ष पहिल्यांदाच हजर झाले होते अशी माहिती ममता बॅनर्जी यांनी दिली.
या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, विरोधकांच्या या बैठकीला प्रत्येक पक्षाने आपापली मते मांडली. त्यानंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वांच्या सहमतीने एकच उमेदवार उभा करण्याबाबत ठराव मांडण्यात आला. मोदी सरकारकडून लोकशाहीला धक्का पोहचवण्याचा प्रयत्न होतोय तो रोखण्यासाठी एक मजबूत उमेदवार उभा केला जाईल असं सांगण्यात आले.
तसेच जे या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांच्याशी १-२ दिवसांत वैयक्तिक संवाद साधला जाईल. त्यांना आजच्या बैठकीत जे काही ठराव झाले ते सांगण्यात येतील असंही पवारांनी सांगितले. तर या बैठकीला विरोधी पक्षातील प्रमुख नेते हजर होते. काही १-२ पक्षांनी गैरहजेरी लावली असली तरी त्यांच्याशी संपर्क साधण्यात आले. या बैठकीत शरद पवार यांना राष्ट्रपतीपदासाठी उभं राहण्यासाठी आग्रह धरण्यात आला परंतु पवारांनी यासाठी नकार दिला. जर शरद पवार राजी झाले तर सगळेच त्यांना पाठिंबा देतील. मात्र नाही झाले तर अन्य उमेदवाराच्या नावाबाबत विचार केला जाईल. लवकरच हे नाव ठरवण्यात येईल असं ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
गोपाळकृष्ण गांधी विरोधी पक्षाचे उमेदवार?राष्ट्रपतीपदासाठी शरद पवारांनी ऑफर नाकारल्यानंतर आता विरोधकांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी(Gopalkrishna Gandhi) यांच्याशी संपर्क साधला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गांधी २०१७ मध्ये उपराष्ट्रपतीपदाचे विरोधी पक्षाचे उमेदवार होते. परंतु व्यैकया नायडू यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. काही विरोधी पक्षातील नेत्यांनी गोपाळकृष्ण गांधी यांना राष्ट्रपती निवडणुकीत संयुक्त उमेदवार म्हणून उभे राहण्याची विनंती करत विचार करण्याचा आग्रह केला आहे.
कोण आहेत गोपाळकृष्ण गांधी?विरोधी पक्षांकडून अन्य नावांचाही विचार केला जात आहे. गोपाळकृष्ण गांधी हे २००४ ते २००९ या काळात पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म २२ एप्रिल १९४५ रोजी महात्मा गांधी यांचे छोटे चिरंजीव देवदास गांधी यांच्या घरी झाला. १९६८ ते १९९२ पर्यंत गोपाळकृष्ण गांधी आयएएस अधिकारी होते. १९९२ मध्ये त्यांनी स्वच्छेने निवृत्ती घेतली. १९८५ ते १९८७ काळात हे उपराष्ट्रपती कार्यालयात सचिव होते.