- हरीश गुप्तानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जून रोजी जी-७ च्या बैठकीसाठी जर्मनीला जात आहेत. त्यामुळे दोन दिवसात भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराबाबत निर्णय घेणे आवश्यक झाले आहे. या पदासाठी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. विद्यासागर राव, हरयाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांचा विचार सुरू आहे. याबाबत भाजपमध्ये विचारविनिमय सुरू आहे. भाजपकडून उपराष्ट्रपतिपदासाठीही नवा चेहरा समोर आणला जाईल.
विद्यासागर राव ऑगस्ट २०१४ मध्ये राज्यपाल झाले ते पंतप्रधान मोदी यांच्या पसंतीनुसारच. बंडारू दत्तात्रेय हे मोदी सरकारमध्ये कामगार मंत्री होते व आता हरयाणाचे राज्यपाल आहेत. हे दोघेही तेलंगणातील असून क्षाशी निष्ठावंत आहेत. बनवारीलाल पुरोहित हे सरकारचे संकटमोचक आहेत. त्यांना संवेदनशील आसाम हे राज्य दिले होते. नंतर तामिळनाडूत पाठविले आणि आता ते पंजाबमध्ये आहेत. तर, थावरचंद गहलोत हे मध्य प्रदेशातील दलित नेते आहेत.
विद्यासागर राव व बंडारू दत्तात्रेय यांची नावे पुढे येण्यामागे हेही एक कारण आहे की, दक्षिणेतील ओबीसी नेत्याकडे राष्ट्रपतीपद जाऊ शकते. तेलंगणाचे राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन हेही ओबीसी आहेत आणि ते तामिळनाडूतील आहेत. पण, काहींचे म्हणणे आहे की, ते भाजपमध्ये नवीन आहेत. जर राष्ट्रपतिपदावर पुरुष उमेदवाराची निवड झाली तर उपराष्ट्रपतिपदासाठी महिलेची निवड होऊ शकते. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची चर्चा आहे. मात्र, उपराष्ट्रपतिपदाबाबतच्या उमेदवाराचा निर्णय जुलैमध्ये होईल.