नवी दिल्ली : देशाच्या नागरी संस्कृतीतील वैविध्य, सहिष्णुता आणि बहुसंख्यकतेची मूळ मूल्ये जपली जावीत. कोणत्याही परिस्थितीत ही मूल्ये वाया घातली जाऊ नये हे आपल्याला ठामपणे मनात ठसवायचे आहे, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बुधवारी केले. दादरीकांडाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे विधान देशातील एकूणच परिस्थितीकडे लक्ष वेधणारे असल्याचे मानले जाते.वैविध्य हीच भारताची शतकानुशतकांची परंपरा राहिली आहे. सहिष्णुता आणि बहुसंख्यकता हीच भारतीय संस्कृतीची मूल्ये राहिली आहेत. ती पायदळी तुडवली जाऊ नयेत यावर माझा ठाम विश्वास आहे. गेल्या अनेक शतकांमध्ये याच मूल्यांनी आपल्याला एकत्र जोडून ठेवले आहे. अनेक प्राचीन संस्कृती लयाला गेल्या आहेत. आक्रमणांपाठोपाठ आक्रमणे झाली. दीर्घ काळ विदेशी राजवट होती, तरीही भारतीय संस्कृती कायम राहिली, कारण संस्कृतीची मूळ मूल्ये आपल्या मनात रुजली गेली आहेत. ही मूल्ये मनात घट्ट राहिल्यास आपल्या लोकशाहीला समोर वाटचाल करण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रणव मुखर्जी यांच्या जीवनावर ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी लिहिलेल्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन राष्ट्रपती भवनात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते झाले. विशेषत: दादरीकांडानंतर देशभरात उफाळलेले राजकारण पाहता त्यांचे विधान महत्त्वपूर्ण ठरते. या कार्यक्रमाला राजनाथसिंग, मुख्तार अब्बास नकवी, अरविंद केजरीवाल, गुलाम नबी आझाद, फारुक अब्दुल्ला आणि अनेक खासदार उपस्थित होते.
राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
By admin | Published: October 08, 2015 4:54 AM