काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'कार्यकर्ता कुत्ता नही होता" (कार्यकर्ता कुत्रा नसतो) असे कृष्णम यांनी एका व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे. आचार्य प्रमोद हे प्रियांका गांधी वाड्रा यांच्या जवळचे मानले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर सध्या आचार्य चर्चेत आहेत.
व्हिडिओमध्ये काय?सुमारे दीड मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये खर्गे एका कार्यक्रमात बोलताना दिसत आहेत. ते म्हणत आहेत की, 'आमच्याकडे एक म्हण आहे. आपण जेव्हा बाजारात जाता, तेव्हा चांगला कुत्रा घ्यायचा असेल अथवा प्राणी घ्यायचा असेल, तर लोक जनावरांच्या बाजारात जाऊन बघतात. जर एखादा प्रामाणिक प्राणी घ्यायचा असेल, तरी त्याचा कान पकडून अशा पद्धतीने वर उचलतात.'
ते पुढे म्हणतायत, 'वर उचलल्यानंतर तो भुंकला तर ठीक आणि जर कुई-कुई केले तर ठीक नाही. कुणी घेत नाही. त्यामुळे आपणही निवड करताना जो भुंकतो, जो वाद करतो, जो आपल्या सोबत राहतो त्याला घेऊन टाका. त्याला बूथ लेव्हल कमिटीचा एजन्ट बनवा आणि जेव्हा बूथमध्ये कुणी बसेल, तेव्हा असा व्यक्ती बसवा, जो सकाली 7 वाजता गेल्यानंतर, पेटी बंद होऊन स्वाक्षरी करूनच बाहेर यायला हवा.'
यावर आचार्य प्रमोद म्हणाले, 'कार्यकर्ता कुत्रा नसतो, कर्मठ आणि कर्मवीर असतो. माननीय अध्यक्ष जी, हे कडवे नक्की आहे, पण सत्य आहे.' महत्वाचे म्हणजे, त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या एका पोस्टमध्ये खर्गेंशिवाय वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनाही टॅग केले आहे.