नवी दिल्ली: माजी पंतप्रधान आणि भाजपाचे दिग्गज नेते अटल बिहारी वाजपेयी यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील अटल स्मृती स्थळावर अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. वाजपेयींच्या 'सदैव अटल' स्मृती स्थळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली. वाजपेयींनी १६ ऑगस्ट २०१८ ला अखेरचा श्वास घेतला. त्याआधी बराच कालावधीपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे ते सार्वजनिक जीवनात सक्रीय नव्हते. सदैव अटल स्मृती स्थळावर वाजपेयींच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. वाजपेयींची मुलगी नमिता कौल भट्टाचार्य, नात निहारिकासह त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य स्मृती स्थळी उपस्थित आहेत. वाजपेयींच्या स्मृतीदिनानिमित्त सदैव अटलवर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वाजपेयींच्या निधनानंतर भाजपानं त्यांच्या अस्थी देशातील १०० नद्यांमध्ये विसर्जित केल्या होत्या. याची सुरुवात हरिद्वारमधील गंगा नदीपासून झाली होती. आपल्या कविता आणि भाषणांमुळे लोकप्रिय झालेले वाजपेयी भाजपाच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यांना २०१४ मध्ये देशातील सर्वोच्च सन्मान असलेल्या भारतरत्ननं गौरवण्यात आलं. १९९६ मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले. मात्र त्यांचं सरकार केवळ १३ दिवस टिकलं. १९९८ मध्ये ते दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. हे सरकार १३ महिने टिकलं. १९९९ मध्ये वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. यावेळी मात्र त्यांनी ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. २००४ नंतर त्यांना प्रकृतीच्या तक्रारी जाणवू लागल्या. त्यानंतर ते राजकारणापासून दूर गेले.
वाजपेयींचा प्रथम स्मृतीदिन; पंतप्रधान, राष्ट्रपतींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 8:24 AM