नवी दिल्ली - भारताच्या नव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची प्रचंड मताधिक्याने निवड करण्यात आली आहे. त्यांनी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना ६ लाख ७६ हजार मते मिळाली. तर यशवंत सिन्हा यांना ३ लाख ८० हजार मतांवर समाधान मानावं लागलं. दरम्यान, आज आपण जाणून घेऊयात देशाचे सर्वोच्च प्रमुख म्हणून राष्ट्रपतींकडे असणाऱ्या खास अधिकारांबाबत जे पंतप्रधानांकडेही नसतात.
देशाचे पंतप्रधान हे सत्तेतील शक्तिशाली पद आहे. मात्र पंतप्रधानांना देशाच्या न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचा कुठलाही अधिकार नाही. मात्र देशाच्या राष्ट्रपतींकडे असे अधिकार आहेत. त्याचा वापर करून राष्ट्रपती कोर्टाने दिलेली फाशीची शिक्षा ते माफ करू शकतात. असे अधिकार पंतप्रधानांकडे नसतात.
त्याशिवाय देशामध्ये आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार हासुद्धा राष्ट्रपतींकडे आहे. स्वत: पंतप्रधान आणीबाणीचा आदेश देऊ शकत नाहीत. मात्र घटनेमधील कलम ७४(१) अन्वये राष्ट्रपतींच्या मदतीसाठी एक मंत्रिमंडळ असेल आणि पंतप्रधान त्याचे प्रमुख असतील आणि राष्ट्रपती त्यांच्या सल्ल्याने आदेश देतील, अशी तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू ह्या आता राष्ट्रपतीपदावर विराजमान होतील. मुर्मू यांना एकूण मतदानापैकी ६४ टक्के मते मिळाली. याशिवाय द्रौपदी मुर्मू ह्या देशाचा सर्वात तरुण राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्याबरोबरच त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनल्या असून, स्वातंत्र्यौत्तर भारतात जन्मलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.