भुवनेश्वर : उत्कल विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या मैत्रीचे उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उपस्थित गर्दीत असलेल्या आपल्या मित्राला पाहिले. त्यानंतर प्रोटोकॉल बाजूला ठेवून मित्राला मंचावर बोलविले आणि गळाभेट घेतली. दरम्यान, 8 डिसेंबरला ओडिसामधील उत्कल विद्यापीठाच्या अमृत महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्या जवळच्या मित्राशी त्यांची भेट झाली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद मृदू स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. अमृत महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लोकांच्या गर्दीतून आपल्या एका जुन्या मित्राला ओळखले. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्याजवळ बसलेले केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या मित्राला मंचावर बोलविण्यास सांगितले. तसेच, मित्र मंचावर येताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याची गळाभेट घेतली. हे पाहून उपस्थितांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला.
दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद याचे असे मित्र कोण आहेत, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर ते ओडिसाचे माजी राज्यसभा सदस्य आहेत. त्यांचे बीरभद्र सिंह असे नाव असून ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. बीरभद्र सिंह हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे 12 वर्षे जुने मित्र आहेत. बीरभद्र सिंह 2000 ते 2006 पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत काम केले होते. यावेळी बीरभद्र सिंह यांनी सांगितले की, जवळपास 12 वर्षानंतर आम्ही दोघे एकमेकांना भेटलो.