नवी दिल्ली - एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांना संसदीय नेतेपदी निवड केल्यानंतर मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीत नरेंद्र मोदी यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली. तसेच त्यांच्या शपथविधीची तारीख, वेळ आणि मंत्र्यांची यादी कळवावी अशी सूचना केली.
नवीन सरकार आपली स्वप्न साकार करण्यासाठी कटीबद्ध आहे. नव्या भारताच्या निर्माणासाठी प्रयत्न करणार आहे. एक क्षणही आरामात जाणार नाही. नेहमी काम करु असं मोदींनी जनतेला आश्वासन दिलं. तसेच सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या धारणेने जनतेची कामं करु असं मोदी यांनी सांगितले.
एनडीएची आज दिल्लीत बैठक झाली या बैठकीत सर्वानुमते एनडीएच्या नेतेपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तसेच 353 खासदारांनी देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाला समर्थन दिलं.
शिरोमणी अकाली दलचे प्रकाश सिंग बादल, एलजेपीचे नेते रामविलास पासवान, शिवसेना नेते उद्धव ठाकरे, जेडीयूचे नेते नितीश कुमार यांच्यासह इतर घटक पक्षाच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्या एनडीएचे नेतेपदीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. 353 खासदारांचे समर्थन असणाऱ्या संसदीय दलाचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली तसेच देशाच्या पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाला समर्थन केले त्याबद्दल भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सगळ्यांचे आभार मानले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद मोदी यांनीही घटक पक्षांचे आणि खासदारांचे आभार व्यक्त केले.
यावेळी मोदींनी सबका साथ, सबका विकास आणि आता सबका विश्वास हा आपला मंत्र आहे. संविधानाची साक्ष ठेऊन संकल्प करा, या देशातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम करुन त्यांना समाजात पुढे आणण्याचं काम करा. समाजातील जातीभेद दूर करा. सर्वांना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे असा सल्ला नरेंद्र मोदींनी उपस्थित खासदारांना दिला. तसेच घरातील उपासना पद्धती कुठलीही असो, बाहेर पडल्यानंतर भारत देश हीच आपली माता आहे असंही सांगितले.