शिर्डी - शिर्डी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते रविवारी सकाळी लोकार्पण करण्यात आले. शिर्डीजवळील काकडी येथे हे विमानतळ उभारण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू हे उपस्थित होते. शिर्डीजवळील काकडी येथे हे विमानतळ उभारण्यात आले आहे. आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विमानतळाचे लोकार्पण केले. त्यानंतर राष्ट्रपती, राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिर्डीत साईशताब्दी महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजस्तंभावर विधिवत ध्वज फडकावून साई समाधी शताब्दीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर साईनगर मैदानावर झालेल्या कार्यक्रमास राष्ट्रपतींनी उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विमान वाहतूक मंत्री गजपती राजू, पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे, खासदार सदाशिव लोखंडे, दिलीप गांधी, आमदार स्नेहलता कोल्हे, संस्थान अद्यक्ष सुरेश हावरे उपस्थिती होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रपतींचा साईमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थानच्यावतीने राष्ट्रपतींचा हावरे यांनी सत्कार केला. "शिर्डीच्या भूमीत येऊन मी स्वतःला धन्य समजतो, गेल्या सत्तावीस वर्षांपासून येतो, आज माझ्यामुळे अनेक भाविकांना असुविधा , समाधी शताब्दी साठी आलो, इथे साईची कर्मभूमी पावन भूमी तिला वारंवार नमन करतो, असे राष्ट्रपती म्हणाले. या विमानतळामुळे भाविकांची सोय होईल, तसेच रोजगाराला चालना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच साई बाबांचे जन्मस्थान अशी श्रद्धा असलेल्या पाथरीच्या विकासासाठी प्रयत्न व्हावेत, असेही त्यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याने विकसित केलेला हा देशातील पहिलाच विमानतळ असल्याचे सांगितले. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विमानतळामुळे आपली स्वप्नपूर्ती झाल्याची भावना व्यक्त केली.
शिर्डी विमानतळाचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण, मुख्यमंत्री, राज्यपाल उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2017 10:37 AM