पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींसंदर्भात खुद्द राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनीही चिंता व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी काही वेळात राष्ट्रपतींना भेटण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदींच्या सुरक्षिततेतील त्रुटींच्या मुद्द्यावर पंजाबमधील चन्नी सरकारवर टीकेची झोड उठली आहे. आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी चन्नी सरकारने उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. ही समिती तीन दिवसांत आपला अहवाल तयार करेल. एका अधिकृत प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या समितीत निवृत्त न्यायमूर्ती मेहताब सिंग गिल आणि प्रधान सचिव (गृह व्यवहार आणि न्याय) अनुराग वर्मा यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आली आहे. या प्रकरणावर शुक्रवारी (7 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकेत पंजाब सरकारला योग्य निर्देश देऊन जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय पुन्हा भविष्यात अशा प्रकारच्या घटना रोखण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट -तत्पूर्वी, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी गुरुवारी पंजाबच्या राज्यपालांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा उपस्थित केला. पंजाब भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांकडे गृहमंत्री आणि डीजीपी यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.