Presidential Election 2022: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचं क्रॉस-व्होटिंग, द्रौपदी मुर्मूंना केलं मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 02:50 PM2022-07-18T14:50:17+5:302022-07-18T14:54:11+5:30
Presidential Election 2022: देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी आज देशभरात मतदान प्रक्रिया सुरू आहे. त्यातच आज मतदान सुरू असताना देशातीत विविध राज्यांमध्ये क्रॉस व्होटिंग झाल्याच्या बातम्या येत आहेत.
नवी दिल्ली - देशाच्या नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी आज देशभरात मतदान प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात थेट लढत होत आहे. या निवडणुकीतील एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना अनेक विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेनेही मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यातच आज मतदान सुरू असताना देशातीत विविध राज्यांमध्ये क्रॉस व्होटिंग झाल्याच्या बातम्या येत आहेत.
गुजरातमध्ये शरद पवारांचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने क्रॉस व्होटिंग केल्याचा दावा केला आहे. गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार के.एस. जडेजा यांनी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याचे जाहीर केले आहे. तर ओदिशामधील काँग्रेसचे आमदार मोहम्मद मुकीम यांनी द्रौपदी मुर्मू यांना मतदान केल्याचे जाहीर केले आहे. मुकीम हे गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज आहेत.
Gujarat | NCP MLA Kandhal S Jadeja says he has voted for NDA's presidential candidate Droupadi Murmu pic.twitter.com/dorgGuOQqT
— ANI (@ANI) July 18, 2022
दरम्यान, महाराष्ट्रामध्येही द्रौपदी मुर्मू यांना २०० हून अधिक आमदारांचा पाठिंबा मिळेल, असा दावा राज्यातील सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाच्या आमदारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत घडलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मू यांना किती मतं मिळतात, याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया आटोपल्यानंतर २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोण विराजमान होणार, याचा उलगडा होईल.