नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडलं. दरम्यान, या मतदानाची मतमोजणी ही २१ जुलैला होणार आहे. मात्र त्यापूर्वी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने द्रौपदी मुर्मू आणि इतरांविरोधात निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी तक्रार केली आहे. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी बंगळुरूमध्ये विधानसभेत द्रौपदी मुर्मू यांना झालेले मतदान अवैध ठरवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या रिटर्निंग ऑफिरसना द्यावेत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
काँग्रेसने आरोप केला की, द्रौपदी मुर्मू हिच्या सांगण्यावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बौम्मई, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कैथल, भाजपाचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा, भाजपाचे मुख्य प्रतोद सतीश रेड्डी आणि मंत्र व ज्येष्ठ नेत्यांनी भाजपाच्या सर्व आमदारांना १७ जुलै रोजी बंगळुरू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावले. तिथे आमदारांच्या प्रशिक्षण शिबिराच्या नावाखाली त्यांना आलिशान खोल्या, भोजन, दारू आणि मनोरंजन पुरवले, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
तसेच मतदानासाठी सर्व मंत्री आणि आमदार बीएमटीसीच्या वातानुकूलित बसमधून हॉटेलमधून विधानसभेत गेले. हा प्रकार म्हणजे आमदारांना लाच देऊन मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रकार आहे. तसेच द्रौपदी मुर्मू यांच्या इशाऱ्यावर हे सारे काही करण्यात आले, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
हॉटेलच्या बिलाचा भरणा हा मुख्यमंत्री आणि भाजपा नेतृत्वाकडून करण्यात आला. ही बाब राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक अधिनियम, १९५२च्या कलम १८१ ए अन्वये भादंवि कलम १७१ बी, १७१ सी, १७१ ई आणि १७१ एफ मधील तरतुदींचं स्पष्ट उल्लंघन आहे. या प्रकरणी द्रौपदी मुर्मू यांच्यासह कर्नाटकचे मुख्यमंत्री, मंत्री भाजपाचे आमदार आणि अन्य नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.