नवी दिल्ली: राज्यातील विधान परिषद निवडणुकीसह देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (Presidential Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. यानंतर महाविकास आघाडी सतर्क झाली असून, विधान परिषदेच्या निवडणुकीत याचा वचपा काढण्यासाठी रणनीति आखली जात आहे. यातच देशभरातील विरोधकांच्या आघाडीने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, शरद पवार यांनी त्याला नम्रपणे नकार दिला. यानंतर आता शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची बैठक होत असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु, या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी गैरहजर राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवारांनी राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्याही नावाचा विचार करण्यात आला होता. मात्र, फारूक अब्दुल्ला यांनीही याला स्पष्ट नकार दिला. अलीकडेच दिल्लीत विरोधकांची एक मोठी बैठक झाली. यानंतर आता शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली २१ जून रोजी विरोधी पक्षांची एक बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही बैठक दिल्लीत होणार आहे.
शरद पवारांच्या बैठकीला १२ पक्षाचे नेते उपस्थित राहणार
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या बैठकीला १२ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीत सहभागी होऊ शकणार नाहीत. मात्र त्यांच्या जागी तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहू शकतात. तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, ममता बॅनर्जी पूर्व नियोजित वेळापत्रकामुळे बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांनी शरद पवारांनाही याबाबत कल्पना दिली आहे. पण आमच्या पक्षाचा एक नेता तिथे उपस्थित राहणार आहे. विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणून देशातील लोकशाही मूल्ये जपणाऱ्या सामान्य उमेदवाराची निवड केली जाईल. विरोधकांकडून राष्ट्रपतीपदासाठी कोणता नवा चेहरा असावा, याबाबत या बैठकीत चर्चा होऊ शकते, असे सांगितले जात आहे.
१८ जुलै रोजी राष्ट्रपदीपदासाठी निवडणूक होणार
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपत आहे. देशाच्या पुढील राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य आणि दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेशांसह सर्व राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य असलेल्या इलेक्टोरल सदस्यांद्वारे राष्ट्रपतीची निवड केली जाते. सुमारे १०.८६ लाख मतांच्या इलेक्टोरल मंडळात भाजपच्या नेतृत्वाखालील युतीला ४८ टक्क्यांहून अधिक मते असल्याचा अंदाज आहे आणि काही प्रादेशिक पक्षांचाही त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी विरोधकांची एक मोठी बैठक पार पडली. या बैठकीत १७ राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांनी नकार दिला. यानंतर काँग्रेसकडूनही उमेदवार उभा केला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. आता नव्या राष्ट्रपतींची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. ममता बॅनर्जींनी सांगितले की, शरद पवार निवडणूक लढवण्यास तयार असतील, तर सर्व विरोधी पक्षाचे यावर एकमत आहे. पण पवारांनी नकार दिल्याने आता नव्या उमेदवारांचा शोध घेतला जात आहे.