Presidential Election: विरोधी पक्षांच्या दोन नेत्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरण्यास नकार दिला आहे. आधी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. आता नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीदेखील निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवली आहे. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नाव पुढे केलं यासाठी त्यांचे आभारी आहोत. तसंच ज्यांनी समर्थन देण्याचं आश्वासन दिलं त्यांचेही आभारी असल्याचं फारुख अब्दुल्ला यांनी निवेदनाद्वारे म्हटलं.
“मी यावर खुप विचार केला. जम्मू काश्मीर सध्या कठिण परिस्थितीतून जात आहे. त्याचा सामना करण्यासाठी माझ्या मदतीची आवश्यकता आहे. यासाठी मी आदरपूर्वक माझं नाव मागे घेऊ इच्छितो. ज्यांनी माझं नाव सूचवलं त्या ममता बॅनर्जी यांचा मी आभारी आहे, तसंच ज्या नेत्यांनी समर्थन देण्याचं आश्वासन दिलं त्यांचाही मी आभारी आहे,” असं फारुख अब्दुल्ला म्हणाले. १५ जून रोजी टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत शरद पवार यांच्यासोबत फारुख अब्दुल्ला, गोपाळ कृष्ण गांधी आणि एनके प्रेमचंद्रन यांच्या नावावरही चर्चा झाली आहे. खरं तर, राष्ट्रपतीपदाचा उमेदवार शोधण्याबरोबरच, एनडीएला टक्कर देण्यासाठी विरोधकांना लक्षणीय मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
काय आहे मतांचं गणित?राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची गणिते पाहिली तर राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी किमान ५,४३,२१६ मतांची आवश्यकता असेल. लोकसभेच्या ५४३ आणि राज्यसभेच्या २३३ सदस्यांच्या मतांचे मूल्य ५४३२०० आहे. सर्व राज्यांच्या विधानसभा सदस्यांच्या एकूण मतांचे मूल्य ५४३२३१ आहे. म्हणजेच, संसद सदस्य आणि सर्व विधानसभेतील सदस्यांच्या एकूण मतांचे मूल्य १०८६४३१ आहे.
देशाच्या सध्याच्या राजकारणात एनडीए आणि यूपीए या दोनच आघाड्या अस्तित्वात आहेत. राष्ट्रपती निवडणुकीच्या दृष्टिकोनातून, एनडीएकडे सुमारे ४८ टक्के मते आहेत आणि त्यांच्या उमेदवाराला विजयासाठी १० हजारांहून अधिक मतांची आवश्यकता आहे. त्याच वेळी, यूपीएकडे जवळपास २३ टक्के मते आहेत. संयुक्त विरोधी पक्षाबद्दल सांगायचं झाल्यास त्यांच्याकडे ५१ टक्क्यांपर्यंत मतं होतात.