राष्ट्रपती निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. यामध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मोठ्या प्रमाणावर मतदान झाले आहे. मुर्मू यांनी युपीएचे यशवंत सिन्हा यांच्यावर आघाडी घेतली आहे.
द्रौपदी मुर्मू यांना खासदारांची ५४० मते मिळाली आहेत. तर सिन्हा यांना २०८ मते मिळाली आहेत. मुर्मू यांना मिळालेल्या मतांची व्हॅल्यू 3,78,000 तर सिन्हा यांना मिळालेल्या मतांचे मुल्य 1,45,600 एवढे होत आहे.
एनडीएकडे असलेल्या खासदारांच्या संख्येपेक्षा जास्त मते मुर्मू यांना मिळाली आहेत.
आता विविध राज्यांच्या आमदारांच्या मतांची मोजणी सुरु होणार आहे.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलैला मतदान घेण्यात आले. देशाचे नवे राष्ट्रपती २५ जुलै रोजी शपथ घेतील. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. १८ जुलैच्या मतदानात संसदेत ७२८ जणांनी मतदान केले. त्यात ७१९ खासदार आणि ९ आमदारांचा समावेश होता. या आमदारांना संसद भवनात मतदान करण्याची परवानगी मिळाली होती. एनडीएचे घटक पक्ष व अन्य प्रादेशिक पक्षांनी दिलेला पाठिंबा लक्षात घेता या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.