सुरेश भुसारी
नवी दिल्ली : राष्ट्रपती पदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना अचानकपणे पाठिंबा देण्यासाठी बाध्य झालेल्या शिवसेनेच्या अडचणीची मला जाणीव असल्याचे सांगून विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे.
विरोधकांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरविण्याच्या प्रक्रियेमध्ये शिवसेना सामील होती. परंतु, अचानकपणे काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. याबाबत यशवंत सिन्हा यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधल्यानंतर ते म्हणाले, ‘शिवसेनेने माझ्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील राजकारणाच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने शिवसेनेची अडचण मी जाणतो’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
...तर ‘सीएए’, ‘एनआरसी’ लागू होऊ देणार नाहीगुवाहाटी : मी जर राष्ट्रपती भवनात पोहोचलो तर सीएए आणि एनआरसी हे कायदे लागू होऊ देणार नाही, अशी घोषणा यशवंत सिन्हा यांनी आसाम दौऱ्यात केली. ते म्हणाले की, राज्यघटनेला बाह्य शक्तींपासून नव्हे तर सत्तेत बसलेल्या लोकांपासून धोका आहे.
पूरस्थिती असल्याने मुंबई दौरा रद्द१७ जुलैचा यशवंत सिन्हा यांचा मुंबई दौरा रद्द झाल्याची माहिती सिन्हा यांचे निवडणूक प्रतिनिधी सुधींद्र कुलकर्णी यांनी दिली. पूरस्थिती असल्याने आमदारांना मुंबईत येणे शक्य नाही. म्हणून हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.