Presidential Poll Sharad Pawar: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी बुधवारी विरोधकांची एक मोठी बैठक पार पडली. या बैठकीत १७ राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचेचे अध्यक्ष शरद पवार यांनी होकार दिल्यास त्यांना विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले जाईल, असे बैठकीनंतर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्टपणे सांगितले. परंतु शरद पवार यांनी या प्रस्तावाला नकार दिला.
“दिल्ली येथे झालेल्या बैठकीत भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून माझे नाव सुचवल्याबद्दल विरोधी पक्षांच्या नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो. तथापि, मला सांगावेसे वाटते की मी माझ्या उमेदवारीचा प्रस्ताव नम्रपणे नाकारला आहे,” असे शरद पवार म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट करत माहिती दिली आहे.
बैठकीला अनेक पक्षांचे नेते आले होते. आम्ही सर्वानुमते उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्ष या उमेदवाराला आपले समर्थन देतील. यावर आम्ही चर्चाही करू. ही एक चांगली सुरुवात आहे. आम्ही अनेक महिन्यांनी एकत्र आलो होतो, पुन्हा एकत्र येऊन चर्चा करू, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. मेहबुबा मुफ्ती आणि अखिलेश यादव पहिल्यांदाच संयुक्त बैठकीला आले होते. या बैठकीला काँग्रेस, शिवसेना, द्रमुकचे नेते आले होते. आठवडाभरात दुसरी बैठक घेण्याचे ठरले आहे. या बैठकीत संयुक्त उमेदवाराचे नाव निवडले जाऊ शकते.