राष्ट्रपती राजवट पुदुच्चेरीमध्ये लागू; पंतप्रधानांचा आज दौरा, काँग्रेसची निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 12:43 AM2021-02-25T00:43:40+5:302021-02-25T00:43:47+5:30
नारायणसामी यांचा राजीनामा राज्यपाल तामिळसाई सौंदरराजन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविला होता.
नवी दिल्ली : बहुमत सिद्ध न करता आल्याने मुख्यमंत्री नारायणसामी यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिल्यानंतर पुदुच्चेरीमध्ये बुधवारी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. या केंद्रशासित प्रदेशात दोन महिन्यांतच निवडणुका होणार आहेत.
नारायणसामी यांचा राजीनामा राज्यपाल तामिळसाई सौंदरराजन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविला होता. तो राष्ट्रपतींनी मंजूर केल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने तिथे तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या चार व द्रमुकच्या एका आमदाराने राजीनामा दिल्याने नारायणसामी सरकार अल्पमतात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी तामिळनाडूबरोबरच पुदुच्चेरीचाही दौरा करणार आहेत. तिथे ते काही योजनांचे भूमिपूजन व उद्घाटन करणार आहेत. त्यांच्या मार्गात व कार्यक्रमांच्या ठिकाणी निदर्शने करण्याचा निर्णय काँग्रेसने केला आहे. भाजपने कटकारस्थान रचून आणि आमदार फोडून निवडणुकीच्या दोन महिने आधी लोकनियुक्त सरकार पाडले, असा काँग्रेसचा आरोप आहे.
भाजपने तसे केले नाही
पुदुच्चेरीमध्ये अण्णा द्रमुकच्या मदतीने भाजप सरकार स्थापन करणार, अशी चर्चा सुरू होती. तिथे भाजपचा एकही आमदार नाही. मात्र तीन राज्यपाल नियुक्त आमदार हे भाजपच्या बाजूचे आहेत. त्यामुळे ते आणि अण्णा द्रमुक यांचे संयुक्त सरकार स्थापन होईल, असे बोलले जात होते. मात्र भाजपने तसे केले नाही आणि राष्ट्रपती राजवटच लागू झाली.