ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा रद्द केल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आगपाखड करणा-या शिवसेनेने आता या मुद्यावर विरोधी पक्षात असलेल्या ममता बॅनर्जींना साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णया विरोधात ममता बॅनर्जींनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र केले असून त्यामध्ये आता त्यांना सत्तेमध्ये असलेल्या शिवसेनेची साथ मिळणार आहे.
आम्ही या मुद्यावर ममता बॅनर्जींसोबत राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत असे लोकसभेतील शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले. तत्पूर्वी मंगळवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्यामध्ये या मुद्यावर फोनवरुन सविस्तर चर्चा झाली.
मागच्या दोन दिवसात शिवसेनेने मुखपत्र सामनामधून या विषयावर अग्रलेख लिहून सरकारवर जोरदार टीकाही केली. मोदींच्या निर्णयामुळे देशात आर्थिक अराजक निर्माण झाले असून, देशातील १२५ कोटी जनता मोदींच्या निर्णयाची शिक्षा भोगत आहे अशी बोचरी टीका या अग्रलेखांमधून करण्यात आली होती. आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून, त्यामध्ये नोटबंदीचा मुद्दा चांगलाच गाजणार आहे.
We will be going with Mamata ji to meet the President today: Arvind Sawant,Shiv Sena #DeMonetisationpic.twitter.com/XKZQ23jXo2— ANI (@ANI_news) 16 November 2016