राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी घेतलेल्या बैठकीत पक्षाच्या खासदारांनी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा आग्रह धरला. आपण याविषयी एक-दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे ठाकरे यांनी खासदारांना बैठकीत सांगितले.
एक-दोन दिवसांत उद्धव ठाकरे हे भूमिका जाहीर करतील, असे खा. गजानन कीर्तीकर यांनी बैठकीनंतर सांगितले. भाजप आणि शिवसेना यांचे संबंध ताणले गेले असताना शिवसेनेच्या खासदारांनी ठाकरे यांच्यावर मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी दबाव आणला आहे. मुर्मू या महिला आहेत व आदिवासी समाजाच्या आहेत. मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांची तुलना करता मुर्मू यांनाच पाठिंबा देणे उचित ठरेल, असे स्पष्ट मत खासदारांनी व्यक्त केले.
खा. संजय राऊत हेही बैठकीला उपस्थित होते. मात्र, ते फारसे बोलले नाहीत. राऊत यांनी मुर्मू यांच्या समर्थनार्थ वा विरोधातही मत व्यक्त केले नाही. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, कोल्हापूरचे संजय मंडलिक, यवतमाळ-वाशिमच्या भावना गवळी, कल्याणचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि परभणीचे खासदार बंडू जाधव हे पाच खासदार बैठकीला हजर नव्हते. काही जण तब्येतीच्या कारणास्तव, तर काही पूर्वनियोजित बैठकींमुळे हजर राहू शकले नाहीत, असे कीर्तीकर यांनी सांगितले. शिवसेनेचे १८ लोकसभा सदस्य आहेत. द्रौपदी मुर्मू या १४ जुलैला मुंबईत येत आहेत. भाजप व शिंदे गटाच्या आमदारांसोबत त्यांची बैठक होणार आहे.
फूट टाळण्यासाठी...मुर्मू यांना पाठिंबा दिला तर शिवसेनेच्या खासदारांमधील फूटही उद्धव ठाकरे यांना टाळता येईल. त्यामुळे लोकसभेतील पक्ष एकसंध राहावा म्हणूनही ते मुर्मू यांना पाठिंबा देतील, असे म्हटले जाते. शिवसेनेच्या ११ खासदारांनी अलीकडेच गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि हे खासदार लोकसभेत वेगळा गट स्थापन करणार असल्याचीही चर्चा आहे.