जम्मू काश्मीरमध्ये मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रात्री उशिरा जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट हटविण्यात आली आहे. याची अधिसूचना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जारी केली.
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी केंद्र सरकारला राष्ट्रपती राजवट हटविण्याची विनंती केली होती. यानुसार मुर्मू यांनी जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट हटविली आहे. मुर्मू या १९ ऑक्टोबरपर्यंत तीन देशांच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वीच मुर्मू यांनी अधिसूचनेला मंजुरी दिली आहे. यामुळे जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. उपराज्यपाल नव्या सरकारच्या स्थापनेसाठी नॅशन कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांना लवकरच निमंत्रण देण्याची शक्यता आहे. सहा वर्षांनी या राज्यातील राष्ट्रपती राजवट हटविण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या पहिल्या शपथविधी सोहळ्याद्वारे इंडिया आघाडी एकता आणि शक्तीचा संदेश देण्याची तयारी करत आहे. या सोहळ्याला देशातील विरोधी पक्षांचे बडे नेते आणि विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित केले जाणार आहे. निमंत्रित यादीत काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे तसेच सपा प्रमुख अखिलेश यादव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची नावे आहेत. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनाही बोलविले जाऊ शकते. शपथविधीची तारीख निश्चित होताच सर्व पाहुण्यांना समारंभास उपस्थित राहण्यासाठी आमंत्रणे पाठवली जातील, असे सुत्रांनी सांगितले.