राष्ट्रपतींचे भाषण म्हणजे खोट्याचे खरे करण्याचा प्रयत्न; काँग्रेसची जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 05:56 AM2019-02-01T05:56:03+5:302019-02-01T05:56:32+5:30
मोदी यांनी केला देशाचा विश्वासघात; काँग्रेसची घणाघाती टीका
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केलेले अभिभाषण म्हणजे सरकार राष्ट्रपतींच्या माध्यमातून खोटे खरे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे काँग्रेसने म्हटले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाष्य केले की,‘सत्य लपू नाही शकत, त्याला पुरले जाऊ शकत नाही, ते बीसारखे असते. नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांचा केलेला विश्वासघात आज सगळ््यांसमोर आहे.’
माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनीही कोविंद यांनी भाषणात केलेले दावे हे वस्तुस्थितीपासून दूर असल्याचे म्हटले. राष्ट्रपतींचे भाषण ऐकून, असे वाटते की चांगले दिवस आले. जी आश्वासने २०१४ मध्ये मोदी यांनी दिली होती ती पूर्ण झाली. शर्मा यांनी विचारले की, कौशल विकास अंतर्गत मोदी यांनी १० कोटी लोकांना कौशल्य प्रवीण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, सरकार फक्त एक कोटी युवकांनाच कौशल संपन्न बनवू शकले.
राष्ट्रपतींमार्फतही प्रचार?
काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी कोविंद यांचे भाषण हे ‘निवडणुकीचे भाषण’ असल्याचे सांगून म्हटले की, राष्ट्रपतींनी आपल्या प्रदीर्घ भाषणात नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दुष्परिणामांचा कोणताच उल्लेख केला नाही. दलित आणि मागासवर्गांच्या सुरक्षेच्या मुद्यावरही सरकारचे मौन आहे. भाषण ऐकून असे वाटते की सरकार राष्ट्रपतींकडून भाजप जणू प्रचार करीत आहे.