नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी आणि रवींद्र संगीत गायिका शुभ्रा मुखर्जी (७४) यांचे मंगळवारी निधन झाले. श्वसनाचा त्रास होत असल्याने गेल्या ११ दिवसांपासून आर्मी रिसर्च अॅन्ड रेफरल हॉस्पिटलमध्ये (लष्करी रुग्णालय) त्यांच्यावर उपचार सुरू होते. सकाळी १० वाजून ५१ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर बुधवारी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनियागांधी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.७ आॅगस्ट रोजी रुग्णालयात दाखल केल्यापासून शुभ्रा यांना अतिदक्षता कक्षात (आयसीयू) ठेवण्यात आले होते. शुभ्रा यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ७ आॅगस्ट रोजी ओडिशाचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतले होते.शुभ्रा मूळच्या बांग्लादेशच्या जेस्सोर येथील असून त्या १० वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंब कोलकात्याला स्थायिक झाले होते. पदवीधर असलेल्या शुभ्रा यांचा जन्म १७ सप्टेंबर १९४० रोजी झाला होता. त्यांच्यावर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा प्रभाव होता. त्यांनी अनेक वर्षे देशातच नव्हे तर युरोप, आशिया आणि आफ्रिकेत रवींद्र संगीत गायन आणि नृत्य, नाटकांचे प्रभावी सादरीकरण केले होते. रवींद्रनाथांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी गीतांजली संगीत समूहाची स्थापना केली होती. प्रणव मुखर्जी आणि शुभ्रा यांचा विवाह १३ जुलै १९५७ रोजी झाला. काँग्रेसचे खा. अभिजित मुखर्जी आणि इंद्रजित आणि कन्या शर्मिष्ठा ही त्यांची अपत्ये होत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राष्ट्रपतींच्या पत्नी शुभ्रा यांचे निधन
By admin | Published: August 19, 2015 1:18 AM