शेतकऱ्यांना लाल किल्ल्यावर कोणी जाऊ दिलं? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 05:58 PM2021-01-29T17:58:32+5:302021-01-29T18:25:07+5:30
Rahul Gandhi on Farmer Protest : नवीन कृषी कायद्यांमुळे देशातील कृषी बाजार समित्या संपुष्टात येतील, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमुळे देशात काळाबाजार वाढेल. या कायद्यांमुळे देशातील कृषी बाजार समित्या संपुष्टात येतील, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. शुक्रवारी राहुल गांधी यांनी या कृषी कायद्यांना तीव्र विरोध करत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. यावरूनही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. लाल किल्ल्यावर जाण्यासाठी लोकांना परवानगी का देण्यात आली? त्यांना का थांबवले नाही? या प्रश्नांची उत्तरं गृहमंत्र्यांनी द्यायला हवीत, असे राहुल गांधी म्हणाले. याचबरोबर, केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे रद्द केले पाहिजेत. जर देशाचे पंतप्रधान शेतकर्यांचे म्हणणे ऐकत नसतील तर आंदोलन आणखी मोठे होऊ शकते. आम्ही सर्व शेतकऱ्यांसोबत आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
Why were people allowed in the Red Fort? Why weren't they stopped? Ask the Home Minister what the objective was, of letting those people inside the premises: Rahul Gandhi, Congress pic.twitter.com/3uGYk0e3h1
— ANI (@ANI) January 29, 2021
राहुल गांधी म्हणाले की, "शेतकरी आंदोलनाबाबत काय सुरु आहे, ते तुम्हाला माहिती आहे. शेतकर्यांना मारहाण केली जात आहे. ते घाबरले आहेत. काय चालू आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पहिला कायदा कृषी बाजार समिती रद्द करेल. दुसरा कायदा कृषी व्यवस्था संपवेल. यामुळे सर्वात मोठे उद्योगपती शक्य तितके धान्याची साठवणूक करू शकतात. तसेच, यामुळे शेतकरी मालाचा भावही ठरवू शकत नाही. तिसरा कायदा असा आहे की, शेतकरी यासंबंधीचे प्रकरण कोर्टात घेऊन जाऊ शकत नाही. हा पूर्णपणे क्रिमिनल अॅक्ट आहे. हे कायदे सरकारने मागे घ्यावेत आणि शेतकर्यांशी चर्चा करावी, असे आम्हाला वाटते."
याचबरोबर, राहुल गांधी यांनी देशातील तरुणांना केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे समजून घेऊन याला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "मला देशातील तरुणांना सांगायचे आहे की त्यांनी कायदा समजून घ्यावा. या कायद्यांमुळे देशाची बाजारपेठ व्यवस्था संपुष्टात येईल. शेतकर्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक दिली जात आहे. कोट्यावधी टन धान्य साठवणूक करण्यासाठी उद्योगपतींना खुली सूट देण्यात आली आहे. हे खूप धोकादायक आहे."