आदेश रावल
नवी दिल्ली : काँग्रेसचे काही नेते आतापर्यंत दबक्या आवाजात काँग्रेस कार्यसमितीची निवडणूक घेण्याची मागणी करत होते. आता माजी अर्थमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मागणी केली आहे की, रायपूर अधिवेशनात कार्यसमितीची निवडणूक घ्यावी, अशी थेट मागणी करणारे चिदंबरम हे पहिले नेते आहेत. अर्थात, हे आपले वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक झाली तर ११ पदांसाठी मतदान होऊ शकते. १२ सदस्यांची नियुक्ती केली जाईल.
तरुणांना संधी द्या : चिदंबरम पी. चिदंबरम यांनी सांगितले की, माझी काही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नाही. मला वाटते की, कार्यसमितीत तरुणांना संधी द्यायला हवी. उदयपूर येथील चिंतन शिबिरात काँग्रेसने ५० टक्के पदे ही ५० वर्षांआतील नेत्यांना देण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. पक्षाने काँग्रेसच्या सर्व सदस्यांची यादी जारी केली आहे. हे सदस्य निवडणूक झाल्यास कार्यसमितीच्या निवडणुकीत मतदान करू शकतात.
छत्तीसगडमध्ये ‘ईडी’चे काँग्रेस नेत्यांवर छापेइडीने सोमवारी छत्तीसगडमधील अनेक ठिकाणी छापेमारी केली. त्यात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी संबंध असलेल्या परिसरांचा समावेश आहे. कोळसा आकारणी प्रकरणाच्या (मनी लॉन्ड्रिंग) चालू तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.राज्याची राजधानी रायपूरमध्ये २४-२६ फेब्रुवारी दरम्यान काँग्रेस पक्षाच्या तीन दिवसीय पूर्ण अधिवेशनाच्या काही दिवस आधी हे छापे पडले आहेत. राज्यात मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची सत्ता आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भिलाई (दुर्ग जिल्हा) येथील आमदार देवेंद्र यादव, छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार रामगोपाल अग्रवाल, छत्तीसगड स्टेट बिल्डिंग आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष सुशील सनी अग्रवाल, रायपूरमध्ये पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आर.पी.सिंग यांचा समावेश असलेल्या डझनभर ठिकाणी सोमवारी पहाटेपासून शोध सुरू आहे.
‘अमृत काळ नव्हे ही अघोषित आणीबाणी’ईडीने सोमवारी छत्तीसगडमध्ये पक्षाच्या नेत्यांवर छापे टाकल्यानंतर काँग्रेसने सरकारची निंदा केली ही कारवाई म्हणजे सूड, सूडबुद्धी आणि छळाचे तृतीय दर्जाचे राजकारणाचे उदाहरण आहे, अशा डावपेचांनी आम्ही घाबरणार नाही, हा ‘अमृत काळ’ नसून “अघोषित आणीबाणी” आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पक्षाचे प्रवक्ते पवन खेरा यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. ईडीला त्यांनी “लोकशाहीचा कर्दनकाळ” असे संबोधले.