ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १० - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या गाडीने अपघात झाल्यानंतर पोलीस तक्रारीत गाडीचा चुकीचा क्रमांक देण्यासाठी आमच्यावर दबाव टाकला जात होता असा आरोप करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यातील प्रमुखाने हा दबाव टाकल्याचा आरोप अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टर रमेश नागर यांच्या मुलाने केला आहे.
अभिषेक नागरने याप्रकरणी राष्ट्रपती प्रणब मुखर्जींना पत्र लिहिलं आहे. अभिषेक नागरने राष्ट्रपतींना पत्र लिहून न्याय देण्याची मागणी केली आहे. स्मृती इराणींविरोधात कारवाई करण्यात नाही आली तर कुटुंबासोबत उपोषणाला बसण्याचा इशारादेखील अभिषेक नागरने दिला आहे.
अपघातात माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ड्रायव्हरने तेथून पळ काढला आणि स्मृती इराणी दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्या. माझ्या वडिलांचा मृतदेह तसाच ठेवून ते निघून गेले. त्यानंतर माझ्यावर पोलीस तक्रारीत DL 3C BA 5315 हा वाहन क्रमांक देण्यासाठी दबाव टाकण्यात आला. पण मी या क्रमांकाची कोणतीच गाडी पाहिलेली नव्हती. आणि या क्रमांकाची गाडी जर असेल तर मला ती पाहायची आहे. पोलीस स्टेशनच्या प्रमुखाने हा नंबर पोलीस तक्रारीत दिला नाही तर गुन्हा नोंद न करण्याची धमकी दिली. पोलिसांनी कार जप्त केल्याचा दावा केला मात्र दाखवण्यास नकार दिला असं या पत्रात लिहिलं गेलं आहे.
पोलिसांनी मात्र अशाप्रकारे कोणताही दबाव टाकला गेल्याच्या आरोपाचं खंडन केलं आहे. कोणीही डॉक्टरच्या मुलावर दबाव टाकला नव्हता. त्यानेच दिल्लीत नोंद असलेल्या कारचा क्रमांक दिला असल्याची माहिती पोलिसांनी दिला आहे.
याअगोदरही रमेश नागर यांची मुलगी संदिलीने स्मृती इराणींवर मदत न करताच गाडीतून निघून गेल्याचा आरोप केला आहे. कोणतीही वैद्यकीय मदत न मिळाल्याने माझ्या वडिलांचा मृत्यू झाला असल्याचं तिच म्हणणं आहे. आम्ही स्मृती इराणींकडे मदत मागितली मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. मी आणि माझा चुलत भाऊ रस्त्यावर मदतीची प्रतिक्षा करत उभे होतो. स्मृती इराणींच्या गाडीने आमच्या दुचाकीला ठोकर दिली. आमची दुचाकी खाली पडल्यावर आम्ही मदत मागितली. मात्र त्यांनी नकार दिला, त्यांनी सांगितल तुम्हा नंतर मदत मिळेल. जर त्यांनी मदत केली असती तर आज माझे वडील जिवंत असते असं संदिलीने सांगितलं आहे.