नवी दिल्ली/लखनौ - राम मंदिर-बाबरी मशिदीच्या जमिनीच्या मालकीच्या वादावर जानेवारीमध्ये सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केल्यानंतर भाजपा, रा.स्व. संघ आणि विश्व हिंदू परिषद, तसेच संत-महंतांनी मंदिर लवकर व्हावे, यासाठी मोदी सरकारवर दबाव आणायला सुरुवात केली आहे. हा क्षोभ लक्षात घेत, अयोध्येत शरयू नदीपाशी रामाचा १५१ मीटर उंचीचा पुतळा उभारण्याची योजना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आखली आहे.निकालास विलंब होत असल्यास केंद्राने वटहुकूम काढावा वा कायदा करावा, अशी मागणी संघ परिवारातूनच होत आहे. मोदी सरकारला साडेचार वर्षे होत आली तरी मंदिराविषयी काहीच प्रगती न झाल्याने संघ परिवार नाराज आहे. पाच राज्यांच्या विधानसभांपैकी एखाद-दुसऱ्या राज्यात फटका बसला तरी त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकांवर होईल, असे संघाचे म्हणणे आहे. त्यामुळे मंदिराचा मुद्दा ऐरणीवर आणणे त्यांना आवश्यक वाटत आहे. दिवाळीनिमित्त अयोध्येत होणाºया समारंभाला योगी आदित्यनाथ जाणार आहेत.शरयू नदीपाशी रामाचा पुतळा उभारण्यात कोणतीही अडचण नाही, असे भाजपाचे म्हणणे आहे. रामाचा १५१ मीटर उंचीचा धनुर्धारी पुतळा बांधण्याचा योगींचा मानस आहे. तो बहुधा ब्रांझचा असेल. त्याची प्रतिकृती प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांनी तयार केली असून, तिला योगींनी मान्यताही दिल्याचे कळते.या वादात आता बाबा रामदेवही उतरले आहेत. अयोध्येत रामाचे मंदिर नव्हे, तर आणखी कोणाचे मंदिर उभारणार की काय, असा प्रश्न करीत, न्यायालयाच्या निकालास विलंब झाल्यास मंदिर उभारणीसाठी सरकार निश्चितच वटहुकूम आणेल, असे त्यांनी म्हटले आहे.दिल्लीत दोन दिवसांची ‘धर्मादेश’ बैठक सुरूनवी दिल्ली : २०१९ मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकांपूर्वी राममंदिराचा मुद्दा ऐरणीवर आला असताना राजधानीत शनिवारी दोनदिवसीय साधू-संतांची धर्मादेश बैठक सुरू झाली. या बैठकीत रविवारी श्री श्री रविशंकर यांच्यासह अनेक मोठे वक्ते आणि स्वत: शंकराचार्य शबरीमालाच्या वादावर विचार व्यक्त करतील. यावेळी राममंदिरावरही प्रस्ताव ठेवला जाईल.तालकटोरा स्टेडियममध्ये ‘धर्मादेश’ नावाने सुरू झालेल्या या बैठकीत देशभरातील ३ हजार साधू-संत आले आहेत. या बैठकीत हिंदू धर्मातील सर्व १२५ संप्रदायांचे संत सहभागी झाले आहेत. प्रयागराज कुंभ मेळाव्यापूर्वीची ही सर्वात मोठी गर्दी आहे.अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री स्वामी जितेंद्रनंद सरस्वती म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने संतांना निराश केले आहे. त्यामुळे या बैठकीत काही तरी मोठा निर्णय होऊ शकेल.अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत साध्वी प्राची यांनी ६ डिसेंबर रोजीच राममंदिराचा शिलान्यास केला जाईल, अशी घोषणा केली. कोणाचीही गरज नाही, राममंदिर उभे राहील, असे त्या म्हणाल्या. रविवारी बैठकीचा समारोप होईल.
राम मंदिरासाठी सरकारवर दबाव, शरयू नदीपाशी पुतळ्याचा योगींचा पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 4:10 AM