ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - सीमारेषेवर तैनात असणारे बीएसएफचे जवान तेज बहादूर यादव यांनी आणखी एक आरोप केला आहे. निकृष्ट जेवण आणि भ्रष्टाचाराबाबत केलेली तक्रार मागे घेण्यासाठी बीएसएफकडून माझ्यावर दबाव टाकण्यात येत आहे, असा आरोप यादव यांनी केला आहे. तशी माहिती त्यांची पत्नी शर्मिला यादव यांनी दिली आहे. पतीसोबत फोनवरुन झालेल्या संवादादरम्यान तक्रार मागे घेऊन माफी मागण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे, अशी माहिती शर्मिला यादव यांनी दिली आहे.
'माझे पती मनोरुग्ण तर त्यांच्या हातात बंदुक का दिली?'
सीमा रेषेवर अहोरात्र तैनात राहून देशाचे रक्षण करणाऱ्या सैन्य दलातील जवानांना निकृष्ट आहार दिला जातो, अशी तक्रार करणाऱ्या जवानाला बेशिस्त ठरवण्यावरही त्यांच्या पत्नीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'जर माझे पती मनोरुग्ण, बेशिस्त आहेत, तर मग देशातील सर्वात संवेदनशील परिसराची सुरक्षा करण्यासाठी बीएसएफने त्यांच्या हातात बंदुक का सोपवली?, असा प्रश्न बीएसएफचे जवान तेज बहादूर यादव यांची पत्नी शर्मिला यादव यांनी उपस्थित केला आहे.
बीएसएफचे जवान तेज बहादूर यादव यांचा निकृष्ट जेवण मिळत असल्याची तक्रार करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला . यानंतर त्यांच्यावर मुजोर, बेशिस्त, दारूबाज असे अनेक आरोप बीएसएफकडून करण्यात आले. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या बातमीनुसार, यादव यांच्या पत्नी शर्मिला यांनी असे सांगितेल की, 'देशाची सेवा करत असताना माझे पती कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करू शकत नाहीत, ही त्यांची समस्या आहे'.
बीएसएफचे जवान तेज बहादूर यादव यांनी अधिका-यांकडून होणा-या भ्रष्टाचाराचा गौप्यस्फोट व्हिडीओतून केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत जवळपास 90 लाख जणांनी पाहिला आहे. तर 4.4 लाख लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. इतकेच नाही तर अनेकांनी तेज बहादूर यादव यांना पाठिंबा देत संंबंधितांवर कारवाईचीही मागणी केली आहे.
मात्र मंगळवारी बीएसएफचे महासंचालक डी.के. उपाध्याय यांनी, तेज बहादूर यादव यांच्याविरोधात बेशिस्तपणाच्या अनेक तक्रारी असून 2010 साली कोर्ट मार्शलची प्रक्रिया केली होती, असे सांगितले. मात्र त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी दिले आहेत.
He told me that he is being pressurised to take the complaint back, and apologise: Sharmila, Wife of Tej Bahadur Yadav, BSF jawan in video pic.twitter.com/hEZ45xTKVu— ANI (@ANI_news) 12 January 2017