हरीश गुप्ता/शीलेश शर्मा, नवी दिल्ली जिगरबाज भारतीय जवानांनी नियंत्रण रेषा ओलांडून पाक प्रशिक्षित अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचे व्हिडीओ, आॅडिओ फुटेज जारी करून पुरावे देण्यासाठी मोदी सरकारवर दबाव वाढत आहे. या कारवाईचे पुरावे द्यावेत, अशी मागणी करणारांमध्ये आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आपला आवाज मिसळला आहे. जवानांच्या धाडसाबद्दल केजरीवाल यांनी मोदींचे कौतुक केले असले, तरी राजकीय खेळी खेळत पाकिस्तानला उघडे पाडण्याची मागणी केली आहे. भारताने कारवाई केल्याच्या दिवसापासून पाकिस्तान अशा प्रकारची कारवाई झालीच नसल्याचे ठासून सांगत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सीमा टेहळणी गटानेही अशा प्रकारच्या कारवाईचा थेट पुरावा उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी या प्रकारचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भारताकडे या कारवाईचे सर्व पुरावे आहेत. योग्य वेळी ते जाहीर करण्यात येतील, त्यासाठी थांबा आणि वाट पाहा, असेही ते म्हणाले. मोदी यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना, पक्षाच्या प्रवक्त्यांना, तसेच वरिष्ठ नेत्यांना ढोल वाजवीत आत्मप्रौढी मिरवू नका, असे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. तथापि, मोदी यांच्या निकटवर्तीयांनाही असे वाटते की, अधिक काळ दबावाला सामोरे जाणे कठीण होईल.काँग्रेस पक्षाचीही मागणीप्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारकडे वेळ नाजूक असल्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड करा, अशी मागणी केली. सर्जिकल आॅपरेशन हे पहिल्यांदाच झाले आहे, असे नाही. फरक एवढाच आहे की मनमोहन सिंग यांच्या सरकारने लष्कराला ते आॅपरेशन जाहीर करावे की नाही याचे अधिकार दिले होते, असे माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी म्हटले. मोदी यांनी या आॅपरेशनला राजकारणाचे कपडे घालून सर्जिकल आॅपरेशन केले, हे जगाला सांगण्याचा स्वत: निर्णय घेतला, असे ते म्हणाले.
‘सर्जिकल’चे पुरावे देण्यासाठी मोदी सरकारवर दबाव
By admin | Published: October 04, 2016 3:49 AM