हरिश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केलेले भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख व लोकसभा सदस्य बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई करण्यासाठी भाजपवर दबाव वाढला आहे.
भाजपच्या अनेक खासदारांनी कारवाई करण्याची मागणी केलेली असल्यामुळे महिला कुस्तीपटूंना वाढता पाठिंबा मिळत आहे. अनेक सेलिब्रेटी, क्रिकेटपटू व खाप पंचायत महिला कुस्तीपटूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. पक्षाभिनिवेश सोडून खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी आंदोलनकर्त्या महिला कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. आठव्यांदा लोकसभेच्या खासदार झालेल्या मनेका गांधी यांनीही या प्रकरणी लवकरच कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. हरयाणातील भाजप खा. बिरजिंदर सिंह यांनीही आंदोलकांना पाठिंबा दिला आहे.
महिला कुस्तीपटूंशी संबंधित काही प्रश्न उपस्थित केल्याने ज्येष्ठ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी व राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांची अस्वस्थता वाढल्याचे दिसून आले. हरिद्वार येथील गंगा नदीत कुस्तीपटूंची पदके अर्पण करण्याबाबत विचारले असता, मीनाक्षी लेखी यांनी पत्रकारांना उत्तर देण्याचे टाळले असून, याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्मृती इराणी किंवा मीनाक्षी लेखी यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत किंवा बृजभूषण यांना पाठिंबा देण्याबाबत एक शब्दही काढला नाही.
जनमत कस्तीपटूंच्या बाजूने झुकू लागले...
- २८ मे रोजीच्या पोलिसांच्या निर्दयी कारवाईनंतर तर महिला कुस्तीपटूंच्या बाजूने हळूहळू जनमत झुकू लागले आहे.
- दिल्ली पोलिसांची संथगती चौकशी व त्याचे राजकीय पडसाद यामुळे भाजप नेतृत्व कमालीचे चिंतेत आहे.
- ज्या महिला कुस्तीपटूंनी देशाचे नाव उंचावले, त्यांच्याशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विषय आहे.
- अशा प्रकरणांत फार उशीर करणे योग्य नाही, असे भाजपच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने सांगितले.