श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बाहेरील नागरिकांना राज्यात स्थावर मालमत्ता खरेदी करण्यास मनाई करणारे राज्यघटनेतील अनुच्छेद ३५-अ कायम राहावे यासाठी काश्मीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. या अनुच्छेदाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, त्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.या प्रश्नावर बंद पाळण्याचे आवाहन नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आदी राजकीय पक्षांनी स्थापन केलेल्या एका संयुक्त समितीने केले होते. या समितीत सय्यद अली शाह गिलानी, मिरवाईज उमर फारुक, मोहम्मद यासिन मलिक आदी फुटीरतावादीही होते. काश्मीरमध्ये होऊ घातलेल्या ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पूर्वतयारीत व्यग्र असल्याने अनुच्छेद ३५-अच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी पुढे ढकलावी, असे जम्मू-काश्मीर सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारला कळविले आहे. दोन दिवसांच्या बंद दरम्यान राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये म्हणून संवेदनशील ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदला राज्यातील बार असोसिएशन, वाहतूकदार व व्यापारी संघटना यांनीही पाठिंबा दिला आहे. याचिका केल्याच्या निषेधार्थ राजकीय पक्षांकडून राज्यात गेल्या काही दिवसांपासून निदर्शनेही सुरु आहेत.>अमरनाथ यात्रा दोन दिवस स्थगितया बंदमुळे अमरनाथ यात्रा रविवारी व सोमवार या दोनदिवसांपुरती स्थगित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जम्मूतून एकाही अमरनाथ यात्रेकरुला पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. २८ जूनपासून सुरु झालेल्या अमरनाथ यात्रेचा २६ आॅगस्ट रोजी समारोप होणार आहे. आतापर्यंत २.७१ लाख जणांनी ही यात्रा पूर्ण केली आहे.
स्थावर मालमत्ता टिकवण्यासाठी काश्मीरमध्ये कडकडीत बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 3:59 AM