सुरेश भटेवरा/लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : छत्तीसगडातल्या सुकमासारखे प्राणघातक हल्ले करण्यासाठी नक्षलवाद्यांकडे पैसा आणि शस्त्रे येतात कोठून? गुप्तचर यंत्रणांनी सरकारला पुरवलेल्या माहितीनुसार बेकायदेशीर खाणकाम, अफूची शेती आणि अपहरणातून मिळणारी खंडणी हे नक्षलवाद्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. सरकारचे विविध विभाग व यंत्रणांशी चर्चा केल्यानंतर नक्षलवाद्यांच्या उत्पन्नाचे हे तमाम स्रोत बंद करण्यासाठी सर्व प्रकारची कारवाई करण्याची सरकारने तयारी चालवली आहे. गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार भारतातल्या नक्षलग्रस्त भागांमधे गेल्या तीन वर्षात बेकायदेशीर खननाची ३.७२ लाख प्रकरणे उघडकीला आली आहेत. याखेरीज सुरूंगासाठी वापरल्या जाणाऱ्या स्फोटकांच्या चोरीची प्रकरणेही मोठया संख्येत आहेत. पेट्रोलियम पदार्थ तसेच स्फोटकांच्या लहान मोठया चोऱ्या देखील मोठया हल्ल्याच्या तयारीला सहाय्यभूत ठरू शकतात, यासाठी स्फोटकांच्या खरेदी विक्रीवर सक्त नियंत्रण व देखरेख ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट चालवूनही माओवादी पैसा उभा करतात, ही बाब लक्षात घेउन झारखंड, छत्तिसगड व तेलंगणात बेकायदेशीररित्या ज्या भागात अफूची शेती केली जाते, त्या भागांवरही लक्ष ठेवण्याच्या सुचना सरकारने दिल्या आहेत. नक्षलवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दलाने योजलेली विविध आॅपरेशन्स चालूच रहाणार आहेत, असे स्पष्ट करीत या सूत्रांनी सांगीतले की गृहमंत्री राजनाथसिंहांनी आंतरराष्ट्रीय सीमांवर विशेष देखरेख ठेवण्याचे आदेश उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
माओवाद्यांना मिळणारी शस्त्रे आणि रसद रोखणार
By admin | Published: May 06, 2017 1:14 AM