हैदराबादऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेत व विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिनिधिंची पाठराखण केली आहे. देशातील सर्व विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी असणं बंधनकारक असायला हवं, असं ओवेसी यावेळी म्हणाले.
ओवेसी यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकेची झोड उठवली आहे. 'केवळ एका समाजाकडे राजकीय शक्ती एकवटली जावी आणि मुस्लिमांना राजकारणात सहभागी होण्याचा कोणताही अधिकार असू नये या खोट्या मुद्द्यावर संघाचे हिंदुत्व आधारलेलं आहे. खोट्या हिंदुत्ववादी संघाच्या विरोधात आव्हान उभारण्याचं काम संसद आणि विधानसभांमध्ये मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींच्या जास्तीत जास्त उपस्थितीतून होईल', या आशयाचं ट्विट असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे.
ओवेसी यांच्या पक्षाने बिहार निवडणुकीत पाच जागांवर विजय प्राप्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट केलं आहे. संसदीय निवडणुकांमध्ये मुस्लिम प्रतिनिधींच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे ओवेसी यांच्या या विधानाला महत्व प्राप्त झालं आहे. त्यात बिहार विधानसभा निवडणुकीत ओवेसी यांच्या पक्षाला मिळालेल्या पाच जागा अतिशय महत्वाचा टप्पा मानला जात आहेत.
बिहारमधील पाच जागांवर मिळालेल्या यशानंतर ओवेसी यांचा पक्ष राष्ट्रीय स्तरावर उभारी घेत असल्याचं बोललं जात आहे. यात असदुद्दीन ओवेसी यांचं नाव मुस्लिम समाजातील सर्वात मोठे नेते म्हणून घेतलं जाऊ लागलं आहे. खरंतर एआयएमआयएम पक्षाची स्थापना १९२७ साली झाली होती. पण त्यावेळी हा पक्ष केवळ तेलंगणा पुरताच मर्यादीत होता. १९८४ पासून हैदराबादच्या लोकसभेच्या जागेवर या पक्षाने निर्विवाद वर्चस्व राखलं आहे. आता या पक्षानं महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही आपलं खातं उघडलं आहे.
२०१४ सालच्या तेलंगणमधील विधानसभा निवडणुकीत ओवेसी यांच्या पक्षाला ७ जागांवर यश मिळालं होतं. तर याचवेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही या पक्षाला २ जागा मिळाल्या होत्या. बिहारमध्ये यावेळी ५ जागांवर यश मिळवून ओवेसी यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.