नवी दिल्ली : फ्युचर समूहाच्या रिटेल आस्थापना मागच्या दाराने ताब्यात घेण्यापासून रिलायन्स उद्योग समूहास रोखण्यात यावे, अशी विनंती बहुराष्ट्रीय कंपनी ॲमेझॉनने सर्वोच्च न्यायालयास केली आहे.
फ्युचर समूहाचा रिटेल व्यवसाय रिलायन्स उद्योग समूहाने खरेदी केला आहे. या व्यवहारास ॲमेझॉनने आक्षेप घेतला असून, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना रिलायन्सकडून फ्युचरचे शॉप्स ताब्यात घेतले जात आहेत, असे ॲमेझॉनने न्यायालयास सांगितले.वकील गोपाल सुब्रमण्यम आणि रणजित कुमार यांनी सांगितले की, फ्युचर लिमिटेडची १,५०० स्टोअर्स आहेत. ८०० पेक्षा अधिक स्टोअर्सचा ताबा रिलायन्सने घेतला आहे.
परस्पर व्यवहाराचा आरोप
याप्रकरणाची पुढील सुनावणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील पीठासमोर २३ मार्च रोजी होणार आहे. फ्युचर समूहाची धारक कंपनी फ्युचर कूपन्समध्ये ॲमेझॉनची ४९ टक्के हिस्सेदारी आहे. त्यामुळे ॲमेझॉनला ३ ते १० वर्षांपर्यंत फ्युचर रिटेलमधील हिस्सेदारी खरेदी करण्याचा प्रथमाधिकार मिळालेला आहे. फ्युचर समूहाने २०२० मध्ये आपला रिटेल, होलसेल आणि लॉजिस्टिक व्यवसाय रिलायन्सला २४,७१३ कोटी रुपयांत परस्पर विकून टाकला.