नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मंगळवारी कोरोना परिस्थितीबाबत ईशान्यकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी पर्यटन क्षेत्रात वाढती गर्दी आणि ईशान्येकडील राज्यांमधील कोरोना संसर्ग वाढण्याचे प्रमाण याविषयी पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली.
आपल्या आरोग्य कर्मचार्यांनी गेल्यावर्षीपासून अधिक मेहनत घेतली आहे. ईशान्येकडील राज्यांनी मोठ्या प्रमाणात लसीचा अपव्यय रोखला आहे. चार राज्यांमध्ये जिथे काही कमतरता दिसून येते, तेथील कामकाजात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. ईशान्य राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे. आपल्याला सतर्क राहावे लागेल, लोकांना सतर्क करत रहावे लागेल. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मायक्रो लेव्हलवर आपल्याला अधिक कठोर पावले उचलावी लागतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
'कोरोना बहुरुपी, त्यावर लक्ष ठेवावे लागेल'पंतप्रधान म्हणाले की, कोरोनाच्या प्रत्येक व्हेरिएंटवर आपल्याला लक्ष ठेवाले लागेल. कोरोना हा बहुरुपी आहे, त्याचे रुप वारंवार बदलते आणि आपल्यासाठी आव्हान निर्माण करते. आम्हाला प्रत्येक व्हेरिएंटवर बारीक नजर ठेवली लागेल. कोरोनामुळे पर्यटन, व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. हिल स्टेशन्स, बाजारपेठेत मास्क न लावता, प्रोटोकॉलचे पालन न करता प्रचंड गर्दी जमवणे ही चिंतेची बाब आहे. हे योग्य नाही. कोरोनाची लाट येण्यापासून कसे रोखले पाहिजे, याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. व्हायरस स्वतःच येत नाही, कोणीतरी जाऊन आणले तर तो येतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
'गर्दी न होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत'कोरोनाची तिसरी लाट येण्यापासून थांबविणे हा एक मोठा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, आपल्या कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्यास कोणतीही तडजोड करण्याची गरज नाही. तज्ज्ञ वारंवार इशाराही देत आहेत की, दुर्लक्ष, निष्काळजीपणा आणि जास्त गर्दीमुळे कोरोना संक्रमणामध्ये मोठी वाढ होऊ शकते. प्रत्येक स्तरावर पावले उचलली पाहिजेत. गर्दी जमण्यापासून रोखण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
याचबरोबर, 'सर्वांसाठी लस, मोफत लस अभियान'ला ईशान्येकडील राज्यांत तितकेच महत्त्व आहे. तिसर्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण मोहीम अधिक तीव्र करावी लागेल. लसीशी संबंधित गोंधळ दूर करण्यासाठी आपल्याला सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक अशा सर्व लोकांना जोडणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पर्यटकांची जागोजागी गर्दीदुसरी लाट ओसरत असतानाच पावसाळा सुरु झाल्यामुळे अनेक पर्यटक सध्या वेगवेगळ्या पर्यटनस्थळी दाखल होत आहेत. विशेषतः ईशान्येकडील राज्यांना पर्यटकांची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. याचबरोबर हिमाचल प्रदेशातील कुलु, मनालीमध्ये पर्यटकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे.