नवी दिल्ली : मुले पळविणाऱ्या टोळ्यांच्या समाजमाध्यमांतून पसरणा-या अफवांवरून जमावांकडून संशयितांना ठार मारले जाण्याच्या घटनांना वेळीच आवर घालण्यासाठी तत्परतेने व कठोर पावले उचलावीत, असे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी सर्व राज्यांना दिले.अशा हिंसाचारात गेल्या काही महिन्यांत देशाच्या अनेक भागांत २० हून अधिक निरपराधांचे बळी गेल्यानंतर केंद्राने हे पाऊल उचलले आहे. दोनच दिवसांपूर्वी सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांनी अशा प्रकारचे हिंसाचार रोखणे हे राज्यांचे कर्तव्य असल्याचे बजावले होते. तसेच केंद्राला एखादी योजना तयार करण्यास सुचविले होते.कायदा आणि सुव्यवस्था हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय आहे व त्यात आम्ही सक्तीच्या स्वरूपात ढवळाढवळ करू शकत नाही, अशी केंद्राची भूमिका आहे. त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांनी काय करावे, याच्या सूचना पाठविल्या आहेत. अशा घटना होऊच नयेत यासाठी काय करावे व झाल्यास त्या तत्परतेने हाताळाव्यात, असे सांगण्यात आले आहे. याआधी सरकारने ‘व्हॉट््सअॅप’ला पत्र लिहून ‘बेजबाबदार व प्रक्षोभक’ संदेशांचा प्रसार रोखण्यासाठी तत्काळ पावले उचलण्यास सांगितले होते. त्यावर ‘व्हॉट््सअॅप’च्या प्रवक्त्याने म्हटले होते की, खोटी व आक्षेपार्ह माहिती पसरविली जाऊ नये यासाठी शक्य असलेले अटकाव आम्ही करत आहोत.अफवा रोखण्यासाठीमुले पळविण्याच्या अफवांचा उगम कुठून होत आहे हे शोधण्याचा प्रयत्न करून त्या पसरणार नाहीत यासाठी पावले उचलावीत.अशा अफवांनी प्रभावित होऊ शकतील, असे भाग शोधून समाज प्रबोधन व सामाजिक संदेशांतून त्यांचे निराकरण करावे.मुले पळविण्याच्या घटना घडल्या तर, लोकांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा यासाठी त्यांचा तपास तत्परतेने केला जावा.
जमावांकडून होणारा हिंसाचार तत्परतेने रोखा; केंद्राकडून सर्व राज्यांना निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 1:53 AM